रेल्वेच्या उभ्या वॅगनमधून पेट्रोलची तस्करी ; सहा अटकेत

अनिल दंदी 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

ठाणेदार सतिश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत पेट्रोलियम गायगांवचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांना माहीती दिली. मुंदडा यांनी साडेतीन वाजता घटनास्थळ गाठले. उरळ पोलिस व भारत पेट्रोलियमचे अधिकारी यांनी पेट्रोलची चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना रंगेहात अटक केली. 

अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणाऱ्या सहा तस्करांना पोलीसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून पेट्रोलने भरलेल्या 16 कॅन व दोन वाहने यासह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नातलगवाडी शिवारात आज पहाटे केली. 

उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पारस रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेव्हॅगनचे नटबोल्ट ढिले करून व सील तोडून त्यामध्ये प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने चार ते पाच इसम पेट्रोलची चोरी करीत असल्याचे आज बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास उरळ पोलिसांच्या गस्ती पथकाच्या दृष्टीस पडले.

ठाणेदार सतिश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत पेट्रोलियम गायगांवचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांना माहीती दिली. मुंदडा यांनी साडेतीन वाजता घटनास्थळ गाठले. उरळ पोलिस व भारत पेट्रोलियमचे अधिकारी यांनी पेट्रोलची चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना रंगेहात अटक केली. 
ही कारवाई करत असताना तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता पेट्रोलची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेल्वेच्या वॅगनमधून चोरी करत असल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी घटनास्थळावरून काळ्या रंगाची कार क्र. एम एच ०१ एसी ०५३५ किंमत (२ लाख ५० हजार रुपये) व त्यामधील पेट्रोलने भरलेल्या प्रत्येकी ३० लिटरच्या प्लास्टिकच्या १२ कॅन, ३ रिकाम्या कॅन (किंमत ४० हजार ३२० रुपये) व लाल रंगाची जिप  क्र. एम एच ३० बी०७३२ (किंमत १ लाख ५० हजार रुपये) 
त्यामधील पेट्रोल भरलेल्या प्रत्येकी ३० लिटरच्या ०४ कॅन व ५४ रिकाम्या कॅन ( किंमत २ हजार २८० रुपये) दोन पाईप (किंमत १ हजार शंभर रुपये) असा एकूण  ४ लाख ४३ हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी साहेब खान समशेर खान (२७), सुधाकर भिकाजी रणवरे(४८), अक्षय प्रकाश आगरकर (२०), रुपेश रमेश भाकरे (१९), गणेश रामकृष्ण भाकरे (४३), शिवहरी प्रकाश भाकरे (२८) सर्व रा. गायगांव या सहा तस्करांना अटक केली.

Web Title: Petrol smuggled from the railways wagon Six Arrested