सोन्याचा भाव पाहूच नका, परवडणारं नाही ते!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

इराणवर हल्ला काय झाला भारताच सोन्याच्या भावात मोठी चमक दिसायला लागली, त्यातही आणखी दरवाढ होण्याचे संकेत सराफा व्यावसायिकांनी दिले असल्याने ही चमक आणखी वाढणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

अकोला : सोने व चांदींच्या बाजारपठेत दोन दिवसांपासून तेजी पहायला मिळत असून अवघ्या दोन दिवसात शहरातील बाजारपेठेत सोने 1400 रुपयांनी महागले असून रविवारी, स्थानिक बाजारात प्रती दहा ग्रॅमसाठी हे दर जीएसटी व्यतिरिक्त 41 हजार 400 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. सध्याची बाजारातील सोन्याची उपलब्धता पहाता हेच दर सोमवारी अजून भडकण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांकडून वर्तविण्यात आली आहे.

पेट्रोलचे दर तब्बल 81.30 रुपयांवर जाऊन पोहचले असून अमेरिकेने बगदादवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती बिघडल्याने इंधन व सोने-चांदीचे दर आणखी वाढणार असल्याचे सराफा असोसिएशनचे प्रकाश सराफ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा - जुने वाहन खरेदी करताय तर सावधान...

Image may contain: one or more people, food and indoor

सोन्याचे दर स्थानिक बाजारात दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी 40 हजार रुपये प्रती दहा ग्रॅम असे होते. मात्र, याच रात्री अमेरिकेने इराणची राजधानी बगदादवर हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय वातावरण तापले आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात इराणचा मोठा वाटा असून भारत इंधन आयातीकरीता इराणवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणवर अमेरिकेकडून टाकला जाणाऱ्या दबावाचे वातावरण लवकर निवळेल अशी शक्यता तूर्तास तरी नसून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन दररोज होत आहे. येत्या काळात ह्या वातावरणाचे तीव्र पडसाद पहायला मिळणार असून पेट्रोलचे दर किमान 5 ते 6 रुपये प्रती लिटरमागे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोन्याचे दरही वेगाने वाढतील असा अंदाज सराफा व्यावसायिकांकडून वर्तविला जात आहे.

हेही वाचा - आंबेडकरांच्या बंगल्यावरच वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

सोमवारी असे होते इंधनाचे दर
पेट्रोल 81.30
स्पीड 84.15
डिझेल 70.95
 

भविष्यात  मोठी वाढ होण्याची शक्यता
इराणच्या राजधानीवर झालेला हल्ला तसेच इतरही जागतिक करणांमुळे डॉलरवर घसरला. त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाला. सोने व चांदीच्या बाजारातील भावात आज तेजी बघायला मिळत असून, दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. भविष्यात सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ होऊ शकते.
-प्रकाश सराफ, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol surpassed Rs 81, but gold also rose