शेकडो कामगारांचे पीएफ दावे ऑनलाइनच्या फेरात

epfo akola
epfo akola

अकोला : आधीच सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हटले जाते. त्यात आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव पडू लागला आहे. शासकीय कार्यालयांमधील कामकाज वर्क फ्रॉम होममुळे प्रभावित झाले असून, कार्यलयातील अत्यल्प कर्मचारी उपस्थितीने फाइलचा ढिग टेबलांवर कायम आहे. यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयही सुटले नाही. ऑनलाइन दावे अर्ज निकाली काढण्याचा वेग खूपच मंद असल्याने कामगारांचे पीएफ दावे तीन-तीन महिन्यांपासून निकाली निघाले नाहीत.


कोरोना विषाणू कोविड-19 मुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला आहे. त्यामुळे एकीकडे कंपन्यांनी कामगारांच्या वेतना कपातीचा सपाटा लावला आहे. या आर्थिक अडचणीमुळे पीएफची रक्कम काढण्याचे दावेही वाढले आहेत. गरजू कामगारांनी पीएफची रक्कम मिळावी म्हणून कार्यालयाकडे दावे केले आहेत. कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर अकोला येथील पीएफ कार्यालयाचे कामही ऑनलाइन सुरू आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारल्यानंतर ते निकाली काढल्याचे मसेज कामगारांना पाठविले जाते. मात्र दावे निकाली काढण्याचा वेग ऑनलाइनमध्येही खूपच कमी आहे. त्यामुळे गरजू कामगारांना तीन-तीन महिन्यांपासून त्यांच्या हक्काची पीएफची रक्कमही मिळाली नाही.

आर्थिक संकटात भर
कामगारांच्या हाताला काम नाही. महिनाभरापासून कोणतेही काम सुरू नसल्याने कंपन्यांनी आता वेतन कपातीसारखे कठोर पाऊल उचलले आहेत. त्यामुळे आयुष्यभर जमा केलेली पीएफची रक्कम कोरोना संकटात मिळावे म्हणून दावे केले जात आहे. एकाचवेळी अनेकांनी ऑनलाइन दावे केल्याने दावे निकाली निघण्याची गती मंदावली आहे.

कोरोना अंतर्गत केलेल्या दाव्यांना प्राधान्य
मोठ्या रकमे ऐवजी कोरोना अंतर्गत केलेले दावे आधी निकाली काढले जात आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ, मोठे आजरपण यासाठी रक्कम हवी म्हणून करण्यात आलेले दावे मागे ठेवले जात आहे. तीन-चार महिन्यांपासून हे दावे रखडले असल्याने गरजू कामगार हतबल झाले आहे.

ना वेतन, ना पीएफ, जगावे कसे?
कोरोना लॉकडाउनमध्ये अडकलेले उद्योग व त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचे वेतन मिळत नसल्याने त्यांना पीएफचा आधार होता. मात्र हे दावेही लवकर निकाली निघत नसल्याने जगावे, असे असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे.

अकोला कार्यालयात तीनच कर्मचारी
अकोला येथील पीएफ कार्यालयातून अकोला, बुलडाणा, वाशीमसह पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचे काम चालते. सध्या कोरोनामुळे कार्यालयात केवळ तीनच कर्मचारी काम करीत आहेत. कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. दाव्यांबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्यांना ऑनलाइन माहिती घ्या, असे खालीच सुरक्षा रक्षाकाकडूनच सांगून परत पाठविले जात आहे. कार्यालयात उपस्थित कर्मचारी केवळ ऑनलाइन अर्ज निकाली काढण्याची कामे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com