पीएचडीच्या विद्यार्थिनीने लावला नऊ बॅक्टेरियांचा शाेध

प्रवीण खेते
शनिवार, 28 एप्रिल 2018

पीएच.डी.चा अहवाल एनसीबीआयकडे हस्तांतरित केल्यावर शोधलेल्या नऊ जिवाणूंचा प्रथमच शाेध लागल्याचे सांगितले. रंगरूपी असलेल्या या जिवाणूंच्या सौंदर्य प्रसाधने आणि औषधींमध्ये उपयाेग हाेणार आहे. यासाठी डॉ. अर्चना पेठे यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले.
- प्रा. माेनिका राेकडे,  संशाेधक

अकाेला : शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागांतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. माेनिका राेकडे यांनी नऊ नवीन बॅक्टेरियांचा शाेध लावल्याचे ‘एनसीबीआय’ने (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन) स्पष्ट केले. त्याची दखल वर्ल्ड जीन बँकने घेतली आहे.

शिवाजी महाविद्यालयात तासिका तत्वार कार्यरत प्रा. माेनिका राेकडे यांनी जुलै 2014 मध्ये शिवाजी महाविद्यालयातच पीएच.डी.ला प्रवेश घेतला. यासाठी त्यांनी ‘स्टडी आॅन बायोडायव्हर्सिटी आॅफ क्रोमोबॅक्टेरिया अँड देअर बायोॲक्टिव्ह फ्रेगमेंट्स’ या विषयाची निवड केली. यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून जीवशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अर्चना पेठे हाेत्या. डॉ. पेठे यांच्या मार्गदर्शनात माेनिका राेकडे यांनी रंगीत बॅक्टेरियांच्या प्रजातींच्या अभ्यासाला सुरवात केली. 

यामध्ये पाणी, सलाईन वॉटर, सांडपाणी, माती, मूत्र, रक्त, अन्न आणि भाजीपाल्यांमधील जिवाणूंचा अभ्यास केला. जिवाणूंवरील चार वर्षांच्या गाढ्या अभ्यासामध्ये त्यांनी जिवाणूंच्या जीन लेव्हलवरही अभ्यास केला. अभ्यासात आढळलेल्या नवीन जिवाणूंची माहिती त्यांनी ‘नॅशनल सेंटर फॉर बायाेटेक्नाेलॉजी इन्फाॅरमेशन’कडे (एनसीबीआय) सादर केली. या अहवालाच्या अभ्यासानंतर या सर्वच नऊ बॅक्टेरियांचा पहिल्यांदाच शाेध लागल्याची पुष्टी ‘एनसीबीआय’ने केली. ‘एनसीबीआय’ने माेनिका राेकडे यांच्या नावाने या नवीन जिवाणूंची नाेंद वर्ल्ड जीन बँककडे केली आहे.

या बॅक्टेरियांचा लावला शाेध
१) सुडाेमाेनास एेराेजुनाेसा
२)  बॅक्टर इंडीकस
३) सिरासीया मार्सिसेंस
४) काेकुरीया टर्फेंसीस
५) काेकुरीया राेझीया
६) काेकुरीया डेक्यांजेंसीस
७) क्राेमाेबॅक्टेरियम व्हायलेसियम
८) सुडाेमाेनाज स्टुझेरी
९) अक्राेमाेबॅक्टेरिया इंसाेलिटस

बॅक्टेरियाचे उपयाेग
 

सौंदर्य प्रसादने

क्रीम्स, लिपस्टीक, बॉडी लाेेशन आदी सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा उपयाेग. तसेच वस्त्रांच्या रंगाेटीसाठी आणि सन गॉगल्सवर विविध रंगाच्या आछादनासाठी देखील जिवाणूंचा उपयाेग हाेताे.

औषध निर्मिती
संशाेधनात समाेर आलेल्या जिवाणूंचा दुष्परिणाम होत नाही. उलट हे जिवाणू कर्कराेग, काेड या आजारांवर बायाे नॅनाे मेडिसिन म्हणून प्रभावी औषध ठरणार आहेत.

कर्कराेग
क्राेडीआेसीन या रंगद्रव्यापासून कॅन्सरवर औषध निर्मिती शक्य आहे. हे रंग द्रव्य सिरासिया मारसेंसेस या बॅक्टेरियामध्ये मुबलक प्रमाणात आढळते.

काेड
मिलॅनिन हे मानवाच्या त्वचेमध्ये असते. ते सुडाेमाेनाझ सुत्झेरी या बॅक्टेरियामध्ये आढळून आले. त्याचा उपयाेग त्वचाराेग, बुरशीपासून हाेणारे त्वचाराेग तसेच व्हिटिलिगाे (काेड) व अल्बेनिझम या राेगावर औषध निर्मितीसाठी शक्य आहे.

नॅनाे टेक्नाेलाॅजीद्वारे नॅनोबायो मेडिसिन
नॅनाे टेक्नाेलॉजीद्वारे सूक्ष्म कणांची निर्मिती करून नॅनाेबायाे मेडिसिनचा शाेध लावला आहे. नॅनाे बायाे मेडिसिनही सध्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहे. या संशाेधनामध्ये कॅन्सर, काेड व अल्बेनिझमच्या बायाेनॅनाे मेडिसिनचा शाेध लागला आहे.

शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थीने पहिल्यांदाच नवीन जिवाणूंचा शाेध लावला आहे. ही अकाेल्यासाठीच नाही, तर देशासाठी अभिमानाची बाब आहे. या जिवाणूंचा बायाेनॅनाे मेडिसिनमध्ये उपयाेग करुन कर्कराेग आणि काेड सारख्या आजारांवर प्रभावी औषध आहे. यासाठी शासनाने प्राेत्साहन देण्याची गरज आहे.
 

- डॉ. अर्चना पेठे, जीवशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय,अकाेला

 

Web Title: PhD Student searched 9 bacteria