चित्र पुस्तिकेतून राष्ट्रसंतांचा जीवन प्रवास प्रतिबिंबित 

tukadoji maharaj
tukadoji maharaj

नागपूर : "एक छायाचित्र हजार शब्दांशी बरोबरी साधते' असे म्हटले जाते. "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या तुकडोजी महाराजांच्या जीवन चित्रदर्शन पुस्तिकेच्या माध्यमातून लाखो शब्दांशी बरोबरी साधली जात आहे. राष्ट्रसंतांच्या या पुस्तिकेच्या माध्यमातून बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा सचित्र प्रवास प्रतिबिंबित करण्यात आला आहे. त्यांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त या पुस्तिकेचा घेतलेला आढावा. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू, व्यक्तिमत्त्व, जीवनकला, समाजकार्य व राष्ट्रकार्य आजवर अनेक साहित्यिकांनी आपापल्या शैलीनुसार मांडले. यातून त्यांचे कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मात्र, त्यांचे दर्शन सेवकांना आणि नागरिकांना चित्रांच्या रूपामध्ये फारसे झाले नाहीत. त्यांची मोजकी छायाचित्रे समाजामध्ये आणि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ही बाब हेरून प्रा. रघुनाथ कडवे आणि धनंजय भिसेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विविध रूपातील छायाचित्रे संकलित करून जीवन चित्रदर्शन पुस्तिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. 
या पुस्तिकेत चाळीस-पन्नास नव्हे तर तब्बल चारशे पन्नास छायाचित्रांचे दर्शन घेता येईल. श्रीगुरुदेव सेवा मंडळातील सेवक-सेविकेंसह देशातील भाविक, शाळा, महाविद्यालयांतील युवक-युवती, शिक्षक-प्राध्यापकांना, साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि पीएच. डी. करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये या पुस्तिकेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे फक्त वर्षभरामध्ये या पुस्तिकेची पहिली आवृत्ती संपली असून, दुसऱ्या आवृत्तीची छपाई लवकरच करण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सुमारे 26 छायाचित्रकार आणि छायाचित्र संग्राहकांकडून या चित्रांचे संकलन करण्यात आले आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवन वेबसाइटच्या रूपामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. या चित्र पुस्तिकेतील चित्रांसह संग्राहकांनी दिलेल्या काही अन्य चित्रांचा त्यामध्ये समावेश असेल. तसेच बालपणापासून ते समाधीपर्यंतचा प्रवास वेबसाइटला भेट देणाऱ्याला एका क्‍लिकवर बघता येणार आहे. वेबसाइटवर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेसह त्यांनी आणि इतर साहित्यिकांनी लिहिलेली हजारो पुस्तके पीडीएफ स्वरूपामध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहेत. वर्षभरामध्ये ही वेबसाइट उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. 
- धनंजय भिसेकर, 
संकलक व संपादक, तुकडोजी महाराज जीवन चित्रदर्शन पुस्तिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com