दिवसा माेलमजुरी....रात्री पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

अकोला (पिंपळखुटा): पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने शासकीय व गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. महिलांसह ग्रामस्थांना दिवसा माेलमजुरी करुन रात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अकोला (पिंपळखुटा): पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने शासकीय व गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. महिलांसह ग्रामस्थांना दिवसा माेलमजुरी करुन रात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

येथील अनेक ग्रामस्थ मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. गावात जवळपास ९ हातपंप आहे, त्यापैकी एकाही हातपंपाला पाणी नाही. शासकीय विहिरीसह हातपंप शोभेची वस्तू बनले आहे. गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्हयातील देऊळगाव येथील उतावळी प्रकल्पातुन पाणी नदीमध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्राम पंचायतने ठराव घेऊन पाणी नदीमध्ये सोडण्याची मागणी १९ एप्रिल रोजी पातुरच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाची तहसीलदारांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे शिफारस केली आहे. नंतर ५ मे रोजी सरपंचांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली. प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही, त्यामुळे येत्या काही दिवसात उतावळी प्रकल्पाचे पाणी नदीमध्ये न सोडल्यास सरपंचांसह गावकरी उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

पाण्याची पातळी खोल गेल्याने गावातील एकाही विहिरीला पाणी नाही. भर उन्हात महिलांसह ग्रामस्थांना डोक्यावर शेतातून पाणी आणावे लागत आहे. उतावळी प्रकल्पातून पाणी सोडले तर पाणी टंचाईवर मात होऊ शकते
- वासुदेव देशपांडे, सामाजिक कार्यकर्ता, पिंपळखुटा

बुलढाणा जिल्हयातील उतावळी प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी ठराव घेऊन तहसीलदारांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे येत्या काही दिवसात ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल
- सुनिता रविंद्र शेलार, सरपंच, पिंपळखुटा

Web Title: Pimpalkhuta residents facing difficulties for water