बघा सरकार, आमच्या रस्त्यांची अवस्था 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • रस्त्यांची दाणादाण, सरकारची कृपादृष्टी होईना 
  • ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट 
  • खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे 
  • जिल्हा परिषदेकडे नाही निधी 

अमरावती : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 3,900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यंदा अवकाळी पावसाचा जोर चांगलाच असल्याने जवळपास दोन हजार किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुरामुळे 50 लहान मोठ्या पुलांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सततधार पाऊस तसेच पुरामुळे अनेक ग्रामीण रस्ते खरडून गेले आहेत. त्यावर डागडुजी करण्यासाठीसुद्धा जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही. दुसरीकडे राज्यात सरकारच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून, अक्षरशः चाळणी झालेली आहे. राज्यात सरकारच नसल्याने मदत कुणाला मागावी, हा सुद्धा प्रश्‍न आहे. मात्र, यापूर्वी सुद्धा बांधकाम विभागाने केलेली मागणी साफ धुडकाविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या नुकसानीचा विचार करता या रस्त्यांच्या कायमस्वरूपी डागडुजीसाठी 120 कोटींचा निधी गरजेचा आहे; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. 

एकूण रस्ते (जिल्हा परिषदअंतर्गत ) 3,900 किलोमीटर 
पूरप्रभावित दोन हजार किलोमीटर 
कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी 120 कोटी रुपये 
तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 25 ते 30 कोटी 
प्रभावित तालुक्‍यांची संख्या 14 
सर्वाधिक प्रभावित मेळघाट 

 


रस्त्यावर पडलेले खड्डे 

खड्डे झाले जीवघेणे

धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न पडला आहे. रस्त्याला चक्क फूटभर आकार आणि खोलीचे खड्डे पडल्याने हा तर खड्ड्यांचा तालुका, अशी काहीशी ओळख धामणगाव तालुक्‍याची वाहनधारकांमध्ये झाली आहे. तालुक्‍यातून जाणाऱ्या राज्य महामार्गासह खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने तालुक्‍यातील रस्त्यांना मलमपट्टीची आवश्‍यकता भासू लागली आहे. 

Image may contain: road, tree, sky, outdoor and nature

श्‍वसनाचा आजार

तालुक्‍यातून नागपूर-औरंगाबाद एक्‍स्प्रेस हायवे हा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यासोबत तालुक्‍यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. धामणगाव-दीपोरी-चांदूर या रस्त्याची चाळण झाली आहे. ग्रामीण भागातून जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे लोट उठतात. त्यामुळे अनेक नागरिकांना श्‍वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तर व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. 

Image may contain: outdoor and nature

रस्त्यांची मलमपट्टी करा

धामणगाव-भिल्ली मार्गावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच वाहनधारकांना कळत नाही. यामुळे दुखण्याबरोबरच प्रवाशांना पाठीच्या मणक्‍यांचे आजार बळावले आहेत. तालुकाअंतर्गत तर परिस्थिती आणखीच भयावह आहे. तालुक्‍यातील गावांना जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सर्वच रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्‍यातील सर्व रस्त्यांची मलमपट्टी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

जनक्षोभ वाढण्याचे संकेत

तालुक्‍यातील महामार्गांसह अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वाहनांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आता तरी प्रशासनाने गंभीर अपघाताची वाट न पाहता रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा जनक्षोभाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. 

Image may contain: tree, motorcycle, plant, outdoor and nature

वाठोडा शुक्‍लेश्‍वर-म्हैसपूर मार्ग खड्ड्यांत

भातकुली तालुक्‍यातील वाठोडा शुक्‍लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वाठोडा ते म्हैसपूर मार्गावरील सोनारखेडा, भालसी, ढंगारखेडा, वाकी या मार्गावरून वाहने ये-जा करतात. हा मार्ग वर्दळीचा आहे. चार -पाच वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु एका वर्षात या रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग आली नाही. प्रशासन या मार्गावर मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

प्रशासनाने द्यावे लक्ष 
आसेगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करतो. आज रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी बिकट स्थिती झाली आहे. त्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. 
- प्रा. राजेश देशमुख

Image may contain: 1 person, sky, outdoor and closeup

मनात असते भीती 
आसेगाव येथे दररोज बाईकने ये-जा करतो. आज रस्त्यावर एवढे खड्डे झाले आहे की घराबाहेर निघतानापण घरी येईल की नाही, अशी भीती मनात राहते. एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मृत्यूच्या सापळ्यातून नागरिकांची मुक्तता करावी. 
- प्रा. गजानन सांगोले

अपघाताच्या घटना अलीकडे वाढ 
चारचाकी वाहन अथवा दुचाकी चालविताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कमरेचे आणि मानेचे आजार उद्‌भवतात. शिवाय वयस्कर व्यक्तींची हाडे नाजूक असल्याने फॅक्‍चर होण्याची देखील शक्‍यता आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. 
- डॉ. गौरव मिलके, अस्थिरोग तज्ज्ञ

Image may contain: 1 person, selfie and closeup

अच्छे दिन आले नाही 
रस्त्यावर खड्डा दिसला तर राजीनामा देईल, असे म्हणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची सत्तेची लालूच सुटत नाही. रस्ते, खड्डे याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नाही. अच्छे दिन आले नाहीत. मणके, सांधे, कमरेचे आजार देणारे दिवस आले. 
- विजय मुंडले, कामनापूर

आंदोलनात्मक पवित्रा घेऊ 
रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षांपासूनच रस्ता उखडायला सुरुवात झाली. यात संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदार यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. रस्त्याचे तत्काळ नव्याने डांबरीकरण करावे, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊ. होणाऱ्या परिणामाला संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदार जबाबदार राहतील. 
- अमित महात्मे, 
सामाजिक कार्यकर्ते

रस्त्याचे काम करा 
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने आम्हाला वाहन चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागातील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे. 
- स्वप्नील बुरघाटे, नागरिक

120 कोटींची मागणी 
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खरडून निघालेल्या रस्त्यांचा अहवाल सरकारला पाठविला आहे. कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी 120 कोटींची गरज असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 20 ते 25 कोटींची आवश्‍यकता आहे. निधीची मागणी बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. 
- प्रदीप गावंडे, 
कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pits on roads of Amravati district