चिमुकल्यांच्या सुटकेसाठी असा रचला "प्लॅन' (व्हिडिओ)

प्रमोद काळबांडे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

""मेरे बाबा मर गए. मेरी मॉं डागा हॉस्पिटल में ऍडमिट है. भय्या कुछ पैसे देदो.'' चार वर्षांची चिमुकली आणि सात वर्षांचा चिमुकला हात पसरत नागपुरातील नवा नकाशा परिसरात घरोघरी फिरत होते. दोघेही बहीणभाऊ. लोकांना दया यायची. लोक जमेल तेवढे पैसे त्यांच्या हाती टाकायचे. परंतु, अचानक या भागातील एका घरी ते गेले. भिकेसाठी हात पसरले... आणि येथून मग एका वेगवान नाट्याला सुरुवात झाली. 

नागपूर : तीस लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात शेकडो चौक आहेत. चौकांत "ट्रॅफिक सिग्नल' लागले आहेत. चौकातील चारही मार्गांनी प्रत्येकी सरासरी किमान पंधरा-वीस सेकंद वाहने आपापल्या "ग्रीन' सिग्नलची वाट पाहत ताटकळतात. एवढ्याच वेळाच अचानक या वाहनचालकांपुढे चार-दोन हात पसरले जातात. हातावरून नजर पुढे सरकताच दिसतात मळकटलेले, फाटके अर्धशरीर कपडे. विस्कटलेले केस. लाचार चेहरे. नागपुरातील अनेक चौकांतील हे दृश्‍य. ही असतात भीक मागणारी बालके. 

भीक मागणारी अशीच काही बालके नागपुरातील वेगवेगळ्या वस्त्यांत फिरायला लागली आहेत. दोन चिमुकली बालके गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील नवा नकाशा परिसरात खूप वेळ फिरायची. कधीतरी अचानक गायब व्हायची. पुन्हा दिसायची. गेल्या आठवड्यात ती जेव्हा याच वस्तीतील शशांक पाटील या तरुणाच्या दारात गेली, तेव्हा एका नवीन घडामोडीने जन्म घेतला. 

 

Image may contain: one or more people and outdoor
भीक मागून पोट भरणे, हाच दिनक्रम असलेली नागपूर येथील झुलता पुलानजीकची वस्ती. 

काय घडले असे... 
शशांक पाटील हा एक उंचपुरा सुशिक्षित तरुण. "ट्विंकल फाउंडेशन' या एका स्वयंसेवी संस्थेचा सक्रिय सदस्य. भीक मागत दारात उभी झालेली ही दोन्ही बालके त्याला दिसली आणि तो थबकलाच. "एवढूशी पोरं. सोबत कुणीच नाहीत. कुठून आली असतील? भीग का मागत असतील?' त्याच्या मनात प्रश्‍नांची कालवाकालव सुरू झाली. शशांकने त्यांना ""आत या बाळांनो'' म्हटले.

लहानशी बालके; परंतु एकमेकांकडे पाहत "आत जायचे का?' असा प्रश्‍न डोळ्यांच्या इशाऱ्याने एकमेकांना विचारला. शशांकने खूप प्रेमाने "बाळांनो' म्हटले होते. इतकी प्रेमळ हाक त्यांनी ऐकली नसावी. धोका नसल्याची खात्री पटताच खुणेनेच दोघांनीही सहमती दर्शविली. मग ती आत आली. शशांकने त्यांना घरातला फराळ दिला. ती अधाशासारखी खाऊ लागली. शशांक मग त्यांना एकएक प्रश्‍न विचारू लागला. त्याला थक्क करणारी माहिती त्या बालकांनी दिली. 

""हमें मॉं के ऑपरेशन के लिए पैसे चाहिए'' 
""बच्चों, तुम भीख क्‍यू मॉंग रहे हो? स्कुल नहीं जाते क्‍या? तुम्हारी मॉं-पिताजी कहॉं है?'' शशांक त्या दोघ्याही चिमुकल्यांना विचारू लागला. मात्र, मोजक्‍याच प्रश्‍नांवर ती बोलत होती. ""मेरी मॉं डागा हॉस्पिटल में ऍडमिट है. पिताजी मर गये. मॉं का ऑपरेशन करना है. हमे पैसे चाहिए.'' अशी विनंती ते करू लागले. त्यांनी माहिती दिली. एव्हाना एकूणच परिस्थिती शशांकच्या लक्षात आली आणि त्याने एक "प्लॅन' आखला. 

...आणि एक "प्लॅन' आखला गेला 
नाश्‍ता करून बालके बाहेर पडताच शशांकही त्यांच्या मागोमाग निघाला. त्यांचा पाठलाग करीत मोबाईलवर तो धडाधडा नंबर डायल करू लागला. पाच जणांची "ऑडिओ कॉन्फरन्स' सुरू होतीच. त्याने पटापट सूचना दिल्या. "सब लोग जल्दी पहुचो' अशी ऑर्डर सोडून आणखी एक वेगळा "नंबर' शशांकने डायल केला. त्याच परिसरात तो पंधरा-वीस मिनिटे त्या बालकांचा पाठलाग करत होता. मग एक-दोन, एक-दोन तरुण-तरुणी पोहोचू लागले. वैभव घरडे, श्रुती भिवगडे, सोना पटले, देबोशिष गुप्ता, निखिल झाडे, अंतरा सारोटकर, रिया चंद्रा, शुभम चिंतनवार आदी मित्रमैत्रिणी पोहोचले. ही सर्व "ट्विंकल फाउंडेशन'ची सदस्य मंडळी. सर्व जमताच आखलेल्या "प्लॅन'ची अंमलबजावणी सुरू झाली. 

 

Image may contain: 2 people, text
"सकाळ बचपन बचाओ' अभियानातून "ट्विंकल फाउंडेशन'च्या सदस्यांनी राबविलेल्या "रेस्क्‍यू ऑपरेशन'च्या "सकाळ'मध्ये प्रकाशित बातम्यांची कात्रण. 

अशी केली बालकांची सुटका 
शशांकने आणखी एक जो "कॉल' केला होता, तो होता नजीकच्या पोलिस नियंत्रण कक्षाला. तरुण-तरुणी जमलेच होते. नजीकच्या पाचपावली पोलिस स्टेशनमधून पोलिस पोहोचताच "प्लॅन'ला गती मिळाली. त्या दोन्ही चिमुकल्यांना शशांकच्या "टीम'ने जवळ घेतले. त्यांना गाडीत बसवले. त्यांच्यासह सर्व जण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिस स्टेशनमध्ये या बालकांची विचारपूस केली. नंतर त्यांना सरकारी "मेयो हॉस्पिटल'मध्ये नेले. डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली आणि या दोन्ही बालकांना वसतिगृहात सोडण्यात आले. भीक मागण्याच्या कलंकित व्यवसायातून या दोन बालकांची सुखरूप सुटका केल्याचे एक अपूर्व समाधान आता शशांक आणि "टीम'च्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. 

 


बालकांच्या "रेस्क्‍यू ऑपरेशन'साठी निघालेली "ट्विंकल फाउंडेशन'ची टीम. 

"बचपन बचाओ' अभियानाला आणखी एक यश 
"ट्विंकल फाउंडेशन' आणि "सकाळ'ने अलीकडेच "बचपन बचाओ' अभियान सुरू केले. नागपूर शहरात चौकाचौकांत सिग्नलवर भीक मागणारी बालके दिसतात. त्यांच्याकडून त्यांच्याच पालकांकडून जबरदस्तीने भीक मागण्याचे काम करून घेतले जाते. समज येण्यापूर्वीच असंख्य निरागस, कोवळ्या बालकांना अक्षरशः भीक मागण्याच्या कामाला जुंपण्यात येते. त्यांच्याकडे पाहून सहृदय नागरिकांना दया येते. त्यामुळे ते त्यांना पैसे देतात, हे या भीक मागणाऱ्या लोकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. "बचपन बचाओ' अभियानातून अशा अनेक बालकांची सुटका करत, त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. 

Image may contain: one or more people

"हमारे पैसे से पिताजी दारू पिते है'' 
या चिमुकल्या बहीण-भावाची आई खरेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे का, हे तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये टीम गेली. तिथे अचंबित करणारे दृश्‍य दिसले. त्यांची आई ऍडमिट नव्हती, तर त्यांच्या आईने जन्म दिलेले तीन दिवसांचे बाळ "इन्टेसिव्ह केअर युनिटमध्ये' ठेवलेले होते. त्या बाळावर उपचार सुरू होते. आई म्हणाली, ""हम इनसे भीक नहीं मंगवाते. हमारा हाथ झटककर यही भाग गये उस दिन.'' ती खोटी बोलत आहे, हे टीमच्या लक्षात आले. बालकाला घेऊन पोलिस स्टेशन गाठले. त्या वेळी त्यांचे वडील त्यांना सोडविण्यासाठी आले. दरम्यान, बालकांनी आपबिती सांगितली होती. ""हमारे पिताजी हमारे पैसे से दारू पिते है. हमको मारते है'', असे त्यांनी सांगितले होते. बालिकेच्या चेहऱ्यावर ताजी जखमही दिसत होती. त्यामुळे या बालकांना त्यांच्या सुपूर्द न करता, वसरिगृहात पाठविण्यात आले. 

 

Image may contain: one or more people, shoes and outdoor
बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तात्पुरती आसऱ्याला आलेली भीक मागणारी माणसे.

"भय्या, हमे यही रहने दो अब'' 
"आपल्याला आईवडिलांपासून दूर केले', या भावनेमुळे ही बालके रडत होती. त्यांना व्यवस्थित खाऊ पिऊ घातले. समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती शांत बसली. वसतिगृहात पाठविल्यावर ती आता ""हमें यही पे रहने दो'', अशी म्हणताहेत, अशी माहिती शशांकने दिली. 

आपल्या शहरात भीक मागणारी बालके दिसल्यास संपर्क करा : शशांक पाटील - मोबाईल नंबर- 9595196669 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plan was designed to get rid of beggar children