नवरोबाचा दुसऱ्या लग्नाचा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

यवतमाळ : पहिली पत्नी जिवंत असताना पुन्हा दुसर्‍या तरुणीसोबत घरठाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जळगावच्या नवरोबाचा लग्नाचा डाव उधळला. दामिनी पथकाने गुरुवारी (ता.21) सकाळी दहाला महावीर भवन गाठून अक्षदा पडण्यापूर्वीच नवरदेवाला ताब्यात घेतले. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात येणार्‍या वावडे या गावच्या तरुणाचा विवाह यापूर्वीच झाला होता. त्याची पहिली पत्नी जिवंत असून, घटस्फोटही घेतला नाही. तरीदेखील त्याने दुसरा घरठाव रचण्याचा प्रयत्न केला. यवतमाळातील एका तरुणीला पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गुरुवारी (ता.21) बालाजी चौकातील महावीर भवनात लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलप्रसंगासाठी पाहुणे मंडळी आली होती. या लग्नाची कुणकूण पहिल्या पत्नीला लागली. याबाबतची तक्रार उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्याकडे आली. त्यांनी लगेच वेळेचे गांभीर्य ओळखून ही माहिती दामिनी पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे यांना दिली. पथकाने लगेच महावीर भवन गाठून बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेल्या नवरोबाला ताब्यात घेतले. फसवणूक झाल्यानंतर तरुणीच्या कुटुंबाने कोणतीही तक्रार केली नाही. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला नाही. त्या नवरदेवाचे समूपदेशन करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विजया पंधरे यांनी दिली.

Web Title: planing of second marriage spoils