येलदरी स्मृतिवनात वृक्षारोपणातून जपल्या जाणार आठवणी अन्‌ आनंदी क्षण!

yeldari.
yeldari.

पुसद (जि. यवतमाळ) : प्रत्येकाच्या कुटुंबात काही आनंदाचे तर काही क्षण दुःखाचे असतात. या क्षण कायम स्मरणात ठेवण्यासाठी पुसद वनविभागाच्या वतीने येलदरी जंगल परिसरात 'स्मृतीवन' साकारण्यात येत आहे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या संकल्पनेतील या स्मृतिवनात सोमवारी (ता.6) निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

पुसदपासून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा-येलदरी सागवृक्षराजीचा विलोभनीय परिसर आहे. राज्यमार्गाला लागून तीन हेक्‍टर क्षेत्रात या निसर्गरम्य स्मृतिवनाची निर्मिती होत आहे. या येलदरी पठाराच्या तीनही बाजूला दरी असून त्यावर 1 हजार 800 वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, चिंच अशा विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यासाठी खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी आठ खंडांची व्यवस्था आहे.

एखाद्या कुटुंबात बाळाचा जन्म झाला असेल, कुणाचे लग्न झाले असेल वा एखाद्याला परीक्षेत नेत्रदीपक यश मिळाले असेल, आयुष्यातील असे आनंदी संस्मरणीय करण्याकरिता स्मृतीवनात आपल्या आवडीचे रोपटे लावण्याचा आणि ते क्षण कायमचे कैद करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर कुणाच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची स्मृती वृक्षारोपणातून जपता येणार आहे, असे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी सांगितले.

येलदरीच्या या पठाराखाली वाहत्या ओढ्याचा खळखळाट असून त्यातील पाणी पठारावरील उंच भागात उभारण्यात आलेल्या टाकीत सोडण्यात येऊन गुरुत्वाद्वारे रोपट्यांना पुरविण्यात येत आहे. पुसद व परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. रोपट्यांची निगराणी व देखभाल वनविभाग करणार असून शक्‍य असेल तेव्हा नागरिकांनी आपल्या रोपट्याला भेट दिल्यास भावनांची गुंफण होईल. "सकाळ ची सैर' करण्यासाठी या वनात वॉकिंग ट्रॅक बनविण्यात आला असून जंगलातील वन्यजीव व पक्ष्यांची माहिती फलकावर देण्यात आली आहे. येत्या काही वर्षातच हा परिसर विकसित झाल्यानंतर पुसदच्या नागरिकांना स्मृतीवनाच्या पर्यटनाचा आनंद घेता येईल.

रोपट्यांची लागवड केल्यानंतर त्याच्या संवर्धनाची जबाबदारी वनखात्याने घेतली असून येत्या काही वर्षात हा परिसर हिरवागार होईल व निसर्गसौंदर्याने नटलेला हा भाग नागरिकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे.
या स्मृती वनात रोपटे लागवडीच्या शुभारंभाला उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, पुसदच्या माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे संचालक अनिरुद्ध पाटील, विजय जाधव तसेच डॉ. अमोल मालपाणी, डॉ. शैलेंद्र नवथडे, बाबूसिंग आडे, शैलेश कोटुरवार, अविनाश कांबळे आदी कुटुंबातील आनंद व स्मृतिक्षण जपण्यासाठी उपस्थित होते.

लुंगी टोपी पद्धती
रोपट्यांची शास्त्रीयदृष्ट्या लागवड करण्याची लुंगी टोपी पद्धती यावेळी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी सांगितली. रोपट्याच्या पिशवीला खाली गोलाकार काप दिला जातो. त्यामुळे पिशवी फुटत नाही. रोपट्यांना इजा पोहोचत नाही. नंतर ही पिशवी खड्डयात ठेवून उभा काप मारला जातो व खड्ड्यात माती भरल्या जाते. त्यामुळे 9 ते 18 महिने विकसित करण्यात आलेल्या रोपट्यावरील माती, वाळू, मजुरी खर्च वाया जात नाही. ही रोपटी लावण्याची लुंगी टोपी पद्धत आहे, असे मुंढे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com