त्यांना मुली आहेत ना... लग्नाची चिंता आतपासून सतावते... म्हणून लावले हे झाड 

Planting of sandalwood at home for financial compromise
Planting of sandalwood at home for financial compromise


वर्धा : प्रत्येकाला मुलांच्या शिक्षणाची, पुढे मुलीच्या विवाहाची चिंता असते. नोकरदारवर्ग मुलांच्या भविष्यासाठी फिक्‍स डिपॉझिट, एलआयसी आदी गुंतवणूक करून ठेवतात. मात्र, ग्रामीण भागातील पालक शेती व्यवसायातून मुलांच्या भवितव्यासाठी चार पैसे शिल्लक ठेवू शकत नाही. वेळप्रसंगी अनेकांना मुलीच्या लग्नासाठी एक-दोन एकर शेती विकावी लागते. कर्जही काढावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन रसुलाबाद ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वृक्षसंवर्धनासोबतच अर्थार्जनही होणार आहे. 

पर्यावरणाचे संतुलन ढासळल्याने आज आपल्याला वृक्षलागवडीची गरज जाणवू लागली आहे. शासनस्तरावरही वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. अनेक जण शेतात सागाची झाडे लावतात. कालांतराने यातून मोठी रक्‍कम मिळते. परंतु आता जमिनीचे तुकडे पडल्याने प्रत्येक जण सागाची झाडे लावू शकत नाही. म्हणून ग्रामपंचायतीने माझे घर माझे गाव समृद्ध योजनेअंतर्गत घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. 

बाजारात चंदनाला सोन्याचा भाव आहे. या झाडाचे व्यवस्थित संगोपन केल्यास दहा ते पंधरा वर्षांनंतर एका झाडापासून 10 लाख रुपये मिळू शकतात, ही बाब लक्षात घेऊन रसुलाबाद ग्रामपंचायतीने घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांना 50 टक्‍के अनुदानावर चंदनाचे झाड दिले जात आहे. 

दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. परिणामी, शेतकरी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी चार पैसे शिल्लक ठेवू शकत नाही. मुलांचे शिक्षण आणि मुलीच्या विवाहासाठी त्यांना कर्ज काढावे लागते. गावातील नागरिकांना पुढे मुलांचे शिक्षण व विवाहासाठी मदत व्हावी, यासाठी घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प ग्रा.पं.ने केला आहे. घरोघरी चंदनाचे झाड लावणारी जिल्ह्यातील ही पहिला ग्रामपंचायत आहे. 

ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना 50 टक्‍के अनुदानावर चंदनाचे रोपटे दिले आहे. आतापर्यंत गावात 400 झाडे लावण्यात आली आहेत. गावात 1123 घरे आहेत. चंदनाच्या झाडापासून 10 ते 15 वर्षानंतर लाखो रुपये मिळतील. ही योजना राबविण्याकरिता ग्रामविकास अधिकारी अशोक बोबडे, सरपंच राजेश सावरकर, माजी सरपंच सदस्य शफीकुर रहेमान, उपसरपंच शीला कणेरी व ग्रामपंचायतीचे सदस्य सहकार्य करीत आहेत. 
 

कुटुंबीयांना मिळणार बक्षीस 


घरोघरी लागवड केलेल्या चंदनाच्या झाडाची ग्रामपंचायत आणि बाहेरून येणारे पर्यवेक्षक पाहणी करणार आहे. ज्या कुटुंबाने झाडाचे संगोपन व्यवस्थित केले. झाडाची उंची, फांद्या आणि खोडाचा आकार आदींचे परीक्षण करून पारितोषित दिले जाणार आहे. पाचव्या वर्षी चंदनाच्या झाडांना स्पर्धेत उतरविणार आहे. कुटुंबीतील सदस्यांना बक्षीस दिले जाईल. 


चंदनाचे झाड देईल आर्थिक बळ 
मुलांना शिक्षणासाठी, पुढे लग्नासाठी लाखो रुपये लागतात. शेतीच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना बचत करणे शक्‍य होत नाही. वेळप्रसंगी मुलीच्या लग्नाला शेतीसुद्धा विकावी लागते. ग्रा.पं.ने घरोघरी चंदनाचे झाड लावण्याचा संकल्प केला आहे. या झाडाचे चांगल्या प्रकारे संगोपन केल्यास हे झाड 10 ते 15 वर्षांनंतर 10 ते 15 लाख रुपये देईल. आर्थिक मदत होईल. 
राजेश सावरकर, सरपंच रसुलाबाद 

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com