प्लॅस्टिक थैलीचा मोह सुटता सुटेना : कारवाईचा केवळ दिखावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

प्लॅस्टिक थैल्यांचा वापर रोखण्याकरीता केवळ कायदेशीर व दंडात्मक कारवाई हा पुरेसा इलाज नाही. नागरिकांनी त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेत स्वतःहून वापर टाळला पाहिजे. प्रत्येक नागरिक स्वतःपासून सुरवात करेल त्याचवेळी प्लॅस्टिक बंदी यशस्वी होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ता नीलेश कंचनपुरे यांनी व्यक्त केले.

अमरावती : दीड वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर प्लॅस्टिक पासून उत्पादित वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्याची मुभा स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण मंडळास दिली. प्रारंभी बंदीची मोहीम धडाक्‍यात चालली, नंतर ती थंडावली व आता बंदी असलेली प्लॅस्टिक थैली सर्रास सर्वत्र उपयोगात येऊ लागली आहे. त्यामुळे बंदी व कारवाई दिखाव्यापुरती ठरली आहे.
प्लॅस्टिकपासून निर्मित थैली सर्वाधिक घातक असल्याचे सिद्ध झाल्याने बंदी घालताना त्यावर अधिक भर दिल्या गेला. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पन्नी वापरण्यावर निर्बंध घालण्यात येऊन त्या जप्तीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. महापालिका क्षेत्रात 4 एप्रिल 2018 पासून 341 प्रतिष्ठानांविरूध्द कारवाई करण्यात येऊन 3264 किलो प्लॅस्टिक थैली जप्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान मनपाने 17 लाख 60 हजार रुपये दंड वसूल केला.
प्रशासकीय कारवाईसोबतच प्लॅस्टिक थैलीचा वापर नागरिकांनी टाळावा म्हणून महापालिकेसह सामाजिक संस्थांनी जनजागृती मोहीमही राबविली. शाळा महाविद्यालयांमधून निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्यात. जनजागृती फेरी काढण्यात आली. वापर टाळावा म्हणून व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात आली. यामुळे सुरवातीच्या काळात प्लॅस्टिक थैलींचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी झाला. भाजीपाला व लहान सहान वस्तूंच्या खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांनी कापडी पिशव्या वापरल्या. आता मात्र कापडी पिशव्या हद्दपार होऊन पुन्हा प्लॅस्टिक थैलीतून सामान विकल्या जाऊ लागले आहे. भाजीपाला, फळ विक्रेते, पानटपरीसह मोठ्या प्रतिष्ठानांतूनही पन्नास मायक्रॉनपेक्षा पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक थैल्या मिळू लागल्या आहेत. महापालिका व प्रदूषण मंडळाची कारवाईही थंडावल्याचे हे परिणाम आहेत.

साफसफाईत आढळल्या प्लॅस्टिक थैल्या
महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरातील केलेल्या मोठ्या नाल्यांच्या साफसफाईत कचऱ्यासोबत प्लॅस्टिक थैल्याच अधिक आढळल्या आहेत. स्वच्छता विभागाचे डॉ. अजय जाधव यांनी दिलेल्या माहीतीनुसार या थैल्या नाल्यावरील पुलाखालील भागात अडकल्याने बहुतांश जागी पाणी तुंबले होते. ते काढताना बराच त्रास कामगारांना सहन करावा लागला. प्रभागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अंतर्गत नाल्यांमधेही (छोटे नाले) प्लॅस्टिक थैल्याच अधिक आढळतात. यावरून नागरिकांनी या थैल्यांचा वापर टाळलेला नाही हे सिद्ध होते.

गायींच्या पोटात प्लॅस्टिक थैली
पशू वैद्यकीय दवाखान्यात गेल्या चार महीन्यात गाईवर झालेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या पोटातून प्लॅस्टिक थैल्या काढण्यात आल्या. रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायी थैल्या सर्रास चघळतात व गिळतातही. त्यामुळे त्यांच्या पोटात गोळा तयार होऊन त्यांना गंभीर आजार होतात. काही पशूमालक उपचारासाठी आणतात. काही गायींचा मात्र उपचाराविना मृत्यू होतो असे पशू वैद्यक अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plastic banned unsuccessful in amravati