16 हजार बॉटल्सपासून तयार केले प्लॅस्टिकचे घर

सुधीर भारती
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती ः स्टील, लोखंडांचा वापर करून सर्वच जण आपल्या स्वप्नातील घर साकारतात. वर्षानुवर्षे ते टिकावे, यासाठी महाग साहित्य बांधकामात वापरताना आपण पाहतो. मात्र अमरावतीत एका ध्येयवेड्याने चक्क प्लॅस्टिकपासून चक्क 2 बीएचके घर तयार केले असून हे घर शहरवासींसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

अमरावती ः स्टील, लोखंडांचा वापर करून सर्वच जण आपल्या स्वप्नातील घर साकारतात. वर्षानुवर्षे ते टिकावे, यासाठी महाग साहित्य बांधकामात वापरताना आपण पाहतो. मात्र अमरावतीत एका ध्येयवेड्याने चक्क प्लॅस्टिकपासून चक्क 2 बीएचके घर तयार केले असून हे घर शहरवासींसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
शहरातील ऍड. नितीन उजगावकर यांनी त्यांच्या कल्पकतेतून प्लॅस्टिक बॉटलपासून हे घर साकारले आहे. त्यांच्या या प्लॅस्टिकच्या घरात 24 तास हवा खेळती राहण्याची व्यवस्था असून घरात भरपूर सूर्यप्रकाश येण्यात व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अनोखे घर उभारण्यासाठी उजगावकर व त्यांचे सहकारी अभियंता सुनील वाघमारे यांना दोन वर्षांचा कालावधी लागला असून तब्बल 16 हजार प्लॅस्टिक बॉटल्सचा या कामांमध्ये वापर करण्यात आला आहे. अमरावती विद्यापीठाला लागूनच असलेल्या राजुरा या छोट्याशा गावात नितीन उजगावकर यांची जागा आहे. या अडीच हजार वर्गमीटर जागेवर त्यांनी 650 वर्गमीटरचे घर उभारले आहे. शहरातील काही हॉटेल्स संचालकांनी त्यांना या कामी मदत केली असून 16 हजार प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याचे उजगावकर यांनी सांगितले. सामान्यपणे लोखंड, स्टील तसेच सिमेंट-विटांच्या अत्याधिक वापरामुळे मध्यमवर्गीयांना घर बांधणे खूप कठीण होते. अनेकांचे तर घराचे स्वप्न पूर्णच होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिक बॉटल्स हा त्यावर चांगला पर्याय असून जुडाईकरिता केवळ सिमेंटचा उपयोग करण्यात आला आहे. या घराच्या आजूबाजूचा परिसर मुद्दाम मोकळा ठेवण्यात आला आहे. त्याठिकाणी वृक्षारोपण व पार्किंग करण्यात आले आहे. घरातच शौचखड्ड्याचा वापर करून शौचालय तयार करण्यात आले आहे. सामान्यपणे सध्या 2 बीएचके फ्लॅटची किंमत सरासरी 20 ते 22 लाखांपर्यंत आहे. मात्र या प्लॅस्टिकच्या घराची किंमत त्यापेक्षा 30 ते 35 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचे श्री. उजगावकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे घर भूकंपरोधक तसेच अग्निरोधक आहे. त्याची आर्युमर्यादा सरासरी 70 ते 75 वर्षे असल्याचा दावाही त्यांनी केला. या घराचे कंम्पाउंडसुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटल्सनी निर्मित आहे. या प्लॅस्टिकपासून निर्मित घराचे लोकार्पण मंगळवारी (ता.13) खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत राजुरा येथे होणार आहे.

आपल्याला वास्तविक घराच्या बांधकामाबाबत फारशी तांत्रिक माहिती नाही, मात्र प्लॅस्टिकचे घर उभारावे हे ठरविले होते. इंटरनेट तसेच अन्य माध्यमातून माहिती घेत हे घर साकारले.
-नितीन उजगावकर, अमरावती  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic house made from 16 thousand bottles