उत्सवाला प्लॅस्टिक प्रदूषणाची किनार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे.

नागपूर - उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकची दोरी, वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे तोरण बांधले जात असून शहरात हजारो किलो प्लॅस्टिक विद्युत खांब, झाडांना बांधण्यात आले आहे. उत्सव आटोपल्यानंतर अनेक महिने तोरण कायम राहत असून कधी वादळाने तुटून तर कधी कुणी जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकत असल्याने हजारो किलो प्लॅस्टिक पडलेल्या किंवा मुख्य मार्गावरच लटकलेल्या स्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषणात आणखीच भर पडली आहे. 

पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर काही प्रमाणात दुकानदारांनीही प्लॅस्टिक पिशव्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यातून ग्राहकांना साहित्य देण्यास प्रारंभ केला. असे असले तरी प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ अंशतःच केली जात असल्याचे चित्र आहे.  शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात तोरण बांधले जाते. एकेकाळी या तोरणासाठी सुतळी, विविध रंगाचे कागद, कापडांचा वापर केला जात होता. आता मात्र प्लॅस्टिकचा बेधडकपणे वापर करण्यात येत आहे. शहरात महापालिका प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर करणारे दुकानदार, व्यापाऱ्यांवर कारवाई करीत आहे. मात्र, तोरणासाठी येणाऱ्या प्लॅस्टिकवर आजपर्यंत एकही कारवाई महापालिकेने केली नसल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तोरणासाठी प्लॅस्टिक शहरात येत असताना महापालिकेचे मौन आश्‍चर्यकारक असल्याचे मत अनेक पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्लॅस्टिकचे तोरण, पताका दिसून येत आहे. अनेकदा वाहनधारकांनाही या तोरणाचा त्रास होतो. शहरात जवळपास हजारो किलो प्लॅस्टिकचा तोरणासाठी वापर होत आहे. मात्र, महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांकडून जुने तोरण कचऱ्यात फेकले जाते किंवा जाळले जाते. प्लॅस्टिक नष्ट होत नाही, प्लॅस्टिक जाळल्याने प्रदूषणात भर पडते, याची जाणीव असूनही केवळ विविध संघटना, विशेषतः धार्मिक संघटना आक्रमक होतील, या भीतीने कारवाई केली जात नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. 

कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक
शहरातील घराघरांतून कचरा गोळा केला जातो. यात प्लॅस्टिक बाटल्या, जाड प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात जमा होतात. आता तर कचऱ्यात प्लॅस्टिक तोरण, पताकाही दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यात प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वाढले असून प्लॅस्टिक बंदी फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. 

कुठल्याही प्लॅस्टिकचा वापर हा प्रदूषणात भर घालतो. प्लॅस्टिक जाळले तर प्रदूषण, नाही जाळले तर सिवेज लाइन, ड्रेनेज लाइन तुंबविण्यास मदत करते. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळून कागद किंवा कापडाचा वापर तोरणासाठी करणे आवश्‍यक आहे. यासाठी जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. 
- कौस्तुभ चॅटर्जी,  संस्थापक, ग्रीन व्हिजिल.

Web Title: Plastics pataka are now being used for the festival and jayanti