नेतागिरी सोडा, जनतेशी संवाद साधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

नागपूर - सत्तेत आल्यानंतर शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे. उपराजधानीचा विकास होत असताना नागरिकांशी संवाद तुटला तरी ते डोक्‍यावर घेतील या भ्रमात राहू नका. कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले, तर महापालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेत येता येईल. त्यामुळे नेतागिरी सोडा अन्‌ जनतेशी संवादावर भर द्या, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाल येथील रजवाडा पॅलेसमध्ये रविवारी शहर भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या समारोपात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना जमिनीवर पाय ठेवण्याचा सल्ला दिला. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, बंडू राऊत, दयाशंकर तिवारी, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार नागो गाणार, संघटन महामंत्री रवी भुसारी, अर्चना डेहनकर, माया इवनाते, देवेंद्र दस्तुरे यांच्यासह शहर भाजप व मनपातील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारकडून शहरात अनेक कामे होत आहे. सारे काही अनुकूल वाटत असले तरी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाण्याची गरज आहे. लोकांशी चर्चेतून कार्यकर्त्यांनी "बॅरिअर‘ तोडण्याचा प्रयत्न करावा. सत्ता असल्याने तुमच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांची गर्दी होईल. परंतु, ही गर्दी म्हणजे पक्षाचा व्याप वाढल्याच्या भ्रमात राहू नका. जनतेशी संवाद महत्त्वाचा आहे. राज्य व केंद्राची कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, शिवाय त्यांच्या मनात काय आहे, ते सरकारपर्यंत पोहोचविण्याचेही काम करा तरच मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक आमदार कोहळे यांनी केले.

वीजबिल भरू नका - खोपडे
आपल्या भाषण शैलीने सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी सध्या शहरात वाढीव वीजबिलामुळे रोष आहे. वीजबिल कुणीही भरू नका, कुणी याबाबत विचारणा करण्यास आल्यास थोबाडीत मारा, अशी चिथावणीच दिली.

Web Title: please communicate with the masses : Devendra fadnavis