पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या प्रवासीसेवेचा लोकार्पण सोहळाही पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मानकापूर येथे मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. दौरा रद्द झाल्याने त्यावरील संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून मेट्रो तसेच जिल्हा प्रशासनाला मोठा फटका बसला.
पंतप्रधान मोदी उद्या, 7 सप्टेंबर रोजी हिंगणा मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या प्रवासी सेवेला हिरवी झेंडी दाखविणार होते. यानिमित्त महामेट्रो तसेच जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्याभरापासून जोरदार तयारी केली होती. अल्पावधीतच दौरा ठरविण्यात आल्याने तयारीसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत झाली. मात्र, हवामान खात्याने उद्या, 7 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा ओडिशाकडून छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान खात्याने राज्य प्रोटोकॉल कार्यालयाला कळविले. राज्य प्रोटोकॉल कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाला कळविले. अखेर पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्रातील तिन्ही ठिकाणचा दौरा रद्द केला. दौरा रद्द झाल्यामुळे महामेट्रोने हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या प्रवासी सेवेचा लोकार्पण समारंभही पुढे ढकलला. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो लोकार्पणासाठी महामेट्रोने जय्यत तयारी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM's visit canceled due to rain