पोलिसांना बेचव पोहे, तर अधिकाऱ्यांना सॅंडविच 

अनिल कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच व्याधीमुक्‍त पोलिस निर्माण व्हावा यासाठी मंगळवारी व शुक्रवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परेड घेतली जाते. यात सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नाश्‍त्यात भेदभाव केला जातो. पोलिस अधिकाऱ्यांना सॅंडविचसह स्वीट दिले जाते, तर कर्मचाऱ्यांना बेचव पोहे देऊन बोळवण केली जाते. 

नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच व्याधीमुक्‍त पोलिस निर्माण व्हावा यासाठी मंगळवारी व शुक्रवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर परेड घेतली जाते. यात सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नाश्‍त्यात भेदभाव केला जातो. पोलिस अधिकाऱ्यांना सॅंडविचसह स्वीट दिले जाते, तर कर्मचाऱ्यांना बेचव पोहे देऊन बोळवण केली जाते. 

मुख्यालयाच्या मैदानावर पोलिसांना कवायतीसह व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात येते. शहरातील 29 पोलिस ठाण्यांसह, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, मुख्यालयासह अन्य शाखांतील पोलिस कर्मचाऱ्यांची परेड होते. यामध्ये पीएसआय ते डीसीपींपर्यंत पोलिस अधिकारी तसेच शिपाई ते सहउपनिरीक्षकापर्यंतचे कर्मचारी सहभागी होतात. 

पहाटे साडेपाच वाजतापासून पोलिस कर्मचारी मैदानावर कवायत करतात. आठ वाजता चहा-नाश्‍त्याची सोय करण्यात येते. कर्मचाऱ्यांना निकृष्ट असलेले बेचव पोहे आणि पांचट चहा दिला जातो. चहामध्ये नावालाच दूध आणि साखर असते. अनेकजण नाइलाजाने पितात, तर काही फेकून देतात. पोह्यामध्ये शेंगदाणे व तेल दिसत नाही, तर हळदीचा वापर भरपूर प्रमाणात असतो. याउलट पोलिस अधिकाऱ्यांना सॅंडविच, स्वीट्‌स, उपमा, बिसलेरी बॉटल आणि कॉफी देण्यात येते. अशाप्रकारचा भेदभाव पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये केल्या जात असल्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, याबाबत कोणताही आवाज उठविल्यास त्याचा "बंदोबस्त' वरिष्ठ अधिकारी करतात. 

अनेकांचा बहिष्कार 

निकृष्ट पोहे आणि गढूळ पाण्यासारखा चहा मिळत असल्यामुळे अनेक पोलिस कर्मचारी चहा व पोहे घेण्यास नकार देतात. त्यामुळे नाश्‍ता बनविणाऱ्या कंत्राटदारांचे फावते. मात्र, कंत्राटदार पोलिस अधिकाऱ्यांची "विशेष' व्यवस्था करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करतो. 

कंत्राटदारावर वरदहस्त? 

मुख्यालयाच्या मैदानाजवळ असलेली पोलिस कॅन्टीन खासगी कंत्राटदार चालवतो. त्यामुळे तो पैसे वाचविण्यासाठी अनेक फंडे वापरतो. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची मर्जी राखतो. त्यामुळे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यामुळे पोलिसांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करीत असल्याची माहिती आहे. 

Web Title: The police are given training exercise with drills