पोलिसांना रिवॉर्डचे पैसे दिलेच जात नाहीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः उत्कृष्ट तपास आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्‍तांच्या वतीने पैशाच्या स्वरूपात रिवॉर्ड घोषित केला जातो. परंतु ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमाच केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची रक्‍कम आयुक्‍तालयाच्या खात्यात पडून आहे. ती खात्यात वळती केली जात नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त आहेत.
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना प्रोत्साहन मिळावे तसेच अन्य कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पोलिस आयुक्‍त आणि पोलिस उपायुक्‍त यांच्याकडून "रिवॉर्ड'च्या स्वरूपात काही हजारांची रक्‍कम बक्षीस म्हणून दिली जाते. त्या रकमेची नोंद कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस शीटमध्ये केली जाते. ती रक्‍कम पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती केली जाते. मात्र, आयुक्‍तालयातील लिपिक वर्ग चिरीमिरीसाठी रिवॉर्डच्या रकमेचा प्रस्ताव अडकवून ठेवतात. ती रक्‍कम कर्मचाऱ्याच्या खात्यात टाकू देत नसल्याची ओरड आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे तसेच कामगिरी उंचवावी यासाठी रिवॉर्डची रक्‍कम 100 रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत केली आहे. मर्डर, दरोडा आणि अपहरणासारख्या तपासात यश प्राप्त करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकदा 75 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम रिवॉर्ड म्हणून पोलिस आयुक्‍तांनी देत कर्मचाऱ्यांचा योग्य तो सन्मान केला आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना मिळालेली ही रक्‍कम केवळ कागदावरच राहत आहे. प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्‍कम येत नसल्यामुळे चांगल्या कामगिरीचे चीज होत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या मनात रुजत आहे. रिवॉर्डची नोंद पोलिस आयुक्‍तालयात कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस शीटमध्ये केली जाते. ही नोंद पदोन्नती, पोलिस महासंचालक पदक, राष्ट्रपती पदक तसेच अन्य स्तरांवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या नामांकनासाठी उपयुक्‍त असते.
आर्थिक हातभार लागेल
गेल्या पाच महिन्यांत अवघड असलेल्या दोन तपासांत पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी 75 हजार रुपयांचा घसघशीत रिवॉर्ड घोषित करीत पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. मात्र, ती रक्‍कम आतापर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती झाली नाही. जर ती रक्‍कम वेळीच कर्मचाऱ्यांना मिळाली तर त्यांना आर्थिक हातभारसुद्धा मिळेल.
कुठे अडते घोडे?
सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड मिळावा म्हणून पोलिस निरीक्षक उपायुक्‍त कार्यालयात प्रस्ताव पाठवितात. उपायुक्‍त कार्यालयातील लिपिक महिनाभर त्या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कुणीतरी टेका लावल्यावर तो प्रस्ताव पोलिस आयुक्‍तालयात जातो. आयुक्‍तालयातील लिपिकवर्ग चिरीमिरीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव लालफीतशाहीत अडकवून ठेवतात, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com