पोलिस आयुक्‍तांचे गुन्हेगारांना ‘सरप्राइज’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नागपूर - गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांना सरप्राइज देऊन दोन दिवसांत तब्बल ६६८ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. अचानक पोलिस रात्रीबेरात्री घरी धडकत असल्याने अनेकांना धडकी बसली आहे. 

नागपूर - गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांना सरप्राइज देऊन दोन दिवसांत तब्बल ६६८ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. अचानक पोलिस रात्रीबेरात्री घरी धडकत असल्याने अनेकांना धडकी बसली आहे. 

शहरात आतापर्यंत घडलेल्या झालेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कुठे ना कुठे रेकॉर्डेड गुन्हेगारांचा समावेश असल्याचे आयुक्‍तांच्या लक्षात आले. या घटना गंभीरतेने घेत पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांच्या मनात धडकी निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नव्या अभियानांतर्गत संपूर्ण पोलिस विभाग आता गुन्हेगारांची तपासणीच नव्हे तर थेट कारवाई करण्यात व्यस्त आहे. आयुक्तांनी अधिकाधिक गुन्हेगारांची माहिती गोळा करून त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

पोलिसांनी आपल्या क्षेत्रात फिरून गुन्हेगारांवर नजर ठेवली पाहिजे. सतत त्यांची चौकशी होत राहिल्यास त्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल. खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण करणारे गुन्हेगार, आर्म्स ॲक्‍ट प्रकरणात अटक झालेले गुन्हेगार आणि लूटमार करणाऱ्या गुन्हेगार असे दोन गट बनविण्यात आले असून सर्व झोनच्या डीसीपींना परिमंडळात होत असलेल्या कारवाईंवर नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

गुन्हे शाखेवर या मोहिमेची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत गुन्हे शाखा आणि ठाण्यातील पोलिसांनी ६६८ गुन्हेगारांची अचानक झडती घेतली. त्यांचा आढावा घेतला. त्यांची सध्याची स्थिती आणि अन्य काही गुन्ह्यांत समावेश आहे का? याची तपासणी पोलिसांनी यावेळी केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगारांची अचानक तपासणी आणि झडती घेण्यात येत आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी असेच अभियान राबविण्यात येईल.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त.

Web Title: Police Commissioner Criminal Cheaking