कर्मचाऱ्याविरोधात होणार पोलिस तक्रार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर : वाळूचे ट्रक सोडण्यासाठी बोगस चालान तयार करण्याचे प्रकरण दै. "सकाळ'ने प्रकाशित करताच प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहे. कर्मचारी दोषी असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार होण्याची चर्चा आहे.

नागपूर : वाळूचे ट्रक सोडण्यासाठी बोगस चालान तयार करण्याचे प्रकरण दै. "सकाळ'ने प्रकाशित करताच प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहे. कर्मचारी दोषी असल्याने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार होण्याची चर्चा आहे.
मर्यादेपेक्षा वाळूच्या जास्त वाहतूकप्रकरणी महसूल व पोलिस विभागाने काही ट्रक जप्त केले होते. हे ट्रक सोडविण्यासाठी ट्रक मालकाने चालानसाठी तहसील कार्यालयात संपर्क साधला. त्यानंतर बॅंकेत रक्कम भरल्यासह ट्रक सोडण्यासाठी पत्रही कर्मचाऱ्याने संबंधित ट्रक मालकास दिले. याआधारे पोलिस ठाण्यातून ट्रकही सोडण्यात आले. मात्र, चालान व दंडाच्या रकमेचा ताळमेळ जुळत नसल्याचे तसेच चालानवर असलेली सही व शिक्के बनावट असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनात आले. त्यांनी संबंधित ट्रक मालकास पत्र पाठवून खुलासा सादर करण्यास सांगितले. संबंधितांनी कर्मचाऱ्याकडून चालान व पत्र देण्यात आल्याची लेखी माहिती दिली. यामुळे हा गैरव्यवहार समोर आला.
दै. "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित कर्मचाऱ्याने चालानची रक्कम जमा केली. त्याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. सही व शिक्काही बोगस असल्याची पुष्टी झाली. मात्र, या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची बदनामी होत असल्याने जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदारांकडून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार आहे. तहसीलदारांच्या अहवालावरून ही कारवाई होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Complaint Against Employee!