पोलिस हवालदाराला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

गोंदिया : मुलाला अटक न करण्याकरिता चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला बुधवारी (ता. 17) अटक करण्यात आली. येथील शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

गोंदिया : मुलाला अटक न करण्याकरिता चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला बुधवारी (ता. 17) अटक करण्यात आली. येथील शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
हिरादास सुखदेव पिलारे (वय 47) असे या पोलिस हवालदाराचे नाव असून, तो शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. यातील तक्रारदार हे मजूर आहेत. 1 जुलै रोजी त्यांचा मुलगा व अन्य दोघांवर एका घटनेत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराच्या मुलाला पोलिस हवालदार पिलारे याने पोलिस ठाण्यात विचारपूस करण्यास बोलावले. मुलगा पोलिस ठाण्यात गेला असता पिलारे याने तुला अटक करायची आहे, या वेळी मुलाने अटक न करण्याची विनंती केली. अटक करतो, पण लॉकअपमध्ये टाकणार नाही, याकरिता पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. ही बाब मुलाने वडिलांना सांगितली. त्यामुळे तक्रारदार 14 जुलै रोजी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी पुन्हा विनंती केली मात्र हवालदाराने लाचेची मागणी केली. या प्रकाराबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून पथकाने पडताळणी करून बुधवारी शहर पोलिस ठाण्यात सापळा रचला. या वेळी ताडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारताना पिलारे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police constable arrested accepting bribe