नागपूर - एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या महंतांना पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण करून त्यांचा हात फॅक्चर केल्याची घटना शनिवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. यामुळे लोहमार्ग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. प्रशांत धोटे (३२, रा. पोलिस क्वॉर्टर, अजनी), असे मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे समजते.

सोनभद्र उद्गम, मध्य प्रदेश निवासी महंत सोमेश्वर गिरी ब्रह्मलीन बारकेश्वरी गिरी (५८) शनिवारी रात्री अकराच्या सुमारास समता एक्स्प्रेसने नागपूर रेल्वे स्थानकावर आले. संत्रामार्केटच्या दिशेने ऑटोरिक्षा करण्यासाठी जात असताना पोलिस शिपाई प्रशांतने महंत यांची तपासणी केली. बॅगमध्ये गांजा असल्याचा संशय पोलिसाने व्यक्त केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच पोलिसाने त्यांना मारहाण केली. पूर्व प्रवेशद्वाराजवळच त्यांचा हात मुरगळला. त्यामुळे त्यांचा हात फॅक्चर झाला. एका महंताला मारहाण होत असल्याने प्रवासी आणि ऑटो चालकांची गर्दी झाली.
दरम्यान, महंत जखमी झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिस शिपाई अजय मसराम आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी धावले. त्यांनी जखमीला लगेच मेयो रुग्णालयात नेले. ही संधी पाहून मारहाण करणारा पोलिस घटनास्थळावरून फरार झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास उपनिरीक्षक गोंडाणे करीत आहेत