न्यायाधीशांना धमकी देणारा पोलिस निरीक्षक कोठडीत; गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने केले होते भांडण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधीशांना धमकी देणारा पोलिस निरीक्षक कोठडीत; गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने केले होते भांडण

न्यायाधीशांना धमकी देणारा पोलिस निरीक्षक कोठडीत; गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याने केले होते भांडण

गडचिरोली: गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांच्या थेट बंगल्यावर जात त्यांना शिवीगाळ, मारहाण व धमकावल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना पोलिसांनी शुक्रवार (ता.२) रात्री अटक केली. न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपी खांडवे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी न्यायालायीन कोठडीत करण्यात आली आहे.

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान २० एप्रिल रोजी पहाटे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी त्या निवडणुकीतील एक उमेदवार आणि माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवून बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात गण्यारपवार यांनी पोलिसांत तक्रारही केली होती.

परंतु गुन्हा नोंद न झाल्याने गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी एन. डी. मेश्राम यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश २० मे रोजी दिले होते.

या आदेशानंतर संतप्त झालेले पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी २५ मे रोजी सकाळी न्यायाधीश मेश्राम यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली, तसेच गालावर थप्पडही मारली. याप्रकरणी न्यायाधीश मेश्राम यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांना माहिती दिल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

त्यानंतर चामोर्शी पोलिसांनी राजेश खांडवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी राजेश खांडवे यांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी निलंबित केले. नंतर खांडवे यांना नागपूरला दवाखान्यात भरती करण्यात आले होते.

शुक्रवारी खांडवे गडचिरोलीत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांनी दिली आहे.

आता सुनावणी शुक्रवारी

अतुल गण्यारपवार यांना आरोपी निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पोलिस स्टेशनमध्ये डांबून बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार (ता. ९ ) होणार आहे.

सध्या आरोपी खांडवेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी गण्यारपवार मारहाण प्रकरणी खांडवे विरोधात न्यायालयाने आदेश दिल्यास त्यांना गण्यारपवार यांना मारहाण आणि न्यायाधीश मेश्राम यांना धमकी व मारहाण अशा दोन प्रकरणांतील आरोपी संबोधले जाणार आहे.