पुसद येथील पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या!

रवींद्र शिंदे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पटेल यांनी स्वत:जवळील पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली असेल, तर का केली व आत्महत्या नसेल, तर हा घातपात तर नाही ना, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

पुसद (जि. यवतमाळ) : दंगानियंत्रक पथकात उपप्रमुख म्हणून कार्यरत पोलिस नाईक अनिस पटेल (वय 30) हे आज बुधवारी (ता. 29) सकाळच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले. येथील शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात सभागृहाच्या मागील बाजूस पटेल मृतावस्थेत आढळून आले. 

दरम्यान, पटेल यांनी स्वत:जवळील पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली असेल, तर का केली व आत्महत्या नसेल, तर हा घातपात तर नाही ना, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. मात्र, या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील दिग्रस येथील मूळ रहिवासी असलेले अनिस पटेल हे यवतमाळ, पुसद व उमरखेड येथे दर 15 दिवसांसाठी कार्यरत असत.

आज बुधवारी सकाळी पुसद शहर पोलिस ठाण्याच्या परिसरातील सभागृहाच्या मागील बाजूस पटेल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिस कर्मचार्‍यांना दिसला. त्यांच्या मृतदेहाजवळच त्यांच्याकडील पिस्तूल व पेनही पडलेला दिसला. याबाबतचे वृत्त शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, ही घटना आत्महत्या आहे की, घातपात? या प्रश्‍नाचे उत्तर तपासानंतरच समजेल, हे मात्र, निश्‍चित.

Web Title: Police killed himself by Pistol at Pusad Yavatmal