व्हॉटसऍप मेसेजमुळे कामठी पोलिसांच्या पायाला चक्री 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कोणताही सुगावा नसताना दमछाक करीत पोलिसानी या प्रकरणात एका तरुणीसह चार आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

कामठी, (जि. नागपूर) :  या आठवड्यात नवीन कामठी पोलिसांच्या हद्दीत दोन घटना झाल्यानंतर आज मंगळवारी एका तरुणीला शेतात जाळल्याची पोस्ट छायाचित्रासह व्हॉट्‌सऍपवर व्हॉयरल झाली. मग काय ठाणेदारांसह डीबी पथकातील कर्मचारी व स्थानिक वार्ताहर घटनास्थळ शोधू लागले. 

सविस्तर असे की, 5 डिसेंबरला नेरी शिवारात जवळपास जळालेले शव मिळाले होते. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने लावला. कोणताही सुगावा नसताना दमछाक करीत पोलिसानी या प्रकरणात एका तरुणीसह चार आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

दोन्ही घटना ताज्या असताना

तर दुसरी घटना सोमवारी आवंढी मार्गावर एका शेतात घडली होती. त्या घटनेत एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेतले होते. त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. या दोन्ही घटना ताज्या असताना मंगळवार दुपारी 3 वाजताच्या दरम्यान एका तरुणीचे अर्धवट जळलेल्या अवस्थेत छायाचित्र व्हायरल झाले. त्यात "आवंढी शिवारात एका अनोळखी तरुणीचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला' असा उल्लेख होता. 

सुटकेचा श्‍वास घेतला

ही पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिस कामाला लागले तर शहरात चर्चेला पेव फुटले. पोलिसांसह नागरिकांनीही आवंढी शिवाराकडे धाव घेतली. आवंढी शिवारात जवळपास दीड तास शोध घेऊनही काहीच मिळाले नाही. अखेर या पोस्टचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली. या पोस्टचा मागोवा घेतल्यावर ती परराज्यातील घटना असून ती फेक असल्याचे समोर आल्यानंतर ठाणेदार संतोष बाकल व डीबी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police on the move due to WhatsApp message