पोलिस दलात पथकांचा सुळसुळाट! 

अनिल कांबळे 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • डिटेक्‍शन की अर्थपूर्ण संबंध? 
  • स्पेशल स्क्‍वॉड हवेत तरी कशाला? 
  • काही पथके निव्वळ नावासाठी स्थापन 
  • "स्पेशल' कर्मचाऱ्यांचा समावेश 

नागपूर : शहर पोलिस दलात पोलिस पथकांचा निव्वळ सुळसुळाट झाला असून, जिकडे पाहिले तिकडे पथकेच पथके दिसत आहेत. पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांपेक्षा पथकांतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही पथके निव्वळ नावासाठी स्थापन करण्यात आल्याची चर्चा आहे. अशा पथकांची संख्या आणि त्यांच्याकडे असलेल्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. 

पोलिस दलातील विश्‍वसनीय सूत्रांनुसार, शहर पोलिस दलात वेगवेगळ्या कामांसाठी पथकांची स्थापना करण्यात येते. यामध्ये तपास, आरोपीची माहिती, गुन्ह्यांची माहिती, छापेमारी, सर्चिंग, गुन्ह्यांचा आढावा तसेच शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात येते. शहरातील पाच परिमंडळातील उपायुक्‍तांकडे "स्पेशल स्क्‍वॉड' म्हणून पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 

उपायुक्‍तांनी केवळ तोंडी आदेश देऊन पथक तयार केले आहे. ज्यामध्ये परिमंडळात असलेल्या पोलिस ठाण्यातील "स्पेशल' कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचे काम केवळ परिमंडळातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती ठेवण्याचे काम आहे. मात्र, हे सर्व कामे सोडून डीसीपी पथक भलतीच कामे करीत असल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे. 

एकत्रित असलेल्या गुन्हे शाखेचे सध्या सहा स्थापन करण्यात आली आहेत. त्यांना प्रत्येक युनिटमध्ये विशेष कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, गुन्हे शाखेची पथकांची दहशत निर्माण व्हावी, असे कोणतेही काम पथके करीत नाही. याउलट पथक "सेटिंग'वर भर देत असल्याची चर्चा आहे. 

पोलिस ठाण्यातील डीबी पथके

प्रत्येक पोलिस ठाण्यात डीबी पथक कार्यरत असते. पोलिस स्टेशनच्या हद्‌दीतील गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे व आरोपींना अटक करण्याची जबाबदारी डीबी पथकावर असते. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी नंदनवनमधील डीबी पथकाने स्वतःच ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेऊन अडीच लाखांची तोडी केली होती. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्रग्ज जप्त करीत स्वतः विक्री करण्याचा प्रयत्नही केला होता. या प्रकरणात पाच पोलिस कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. तर अजनीच्या डीबी पथकाने एका भूखंडाच्या फसवणुकीत ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर सोडून दिल्याची चर्चा होती. 

उदंड जाहली पोलिस पथके!

शहर पोलिस दलात गुन्हे शाखा, पोलिस उपायुक्‍त कार्यालय, विशेष शाखा, पोलिस नियंत्रण कक्षाद्वारे अनेक पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एनडीपीएस पथक, दामिनी पथक, गस्त पथक, एसएसबी पथक, महिला सुरक्षा पथक, मिसिंग पथक, वाहन चोरी विरोधी पथक, ठोको पथक आणि चेनस्नॅचिंग पथक यासह आणखी काही पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

परवानगी मिळविण्यासाठी धडपड

गुन्हे शाखेच्या पथकाशिवाय शहरात एकही जुगारअड्डा, सट्टापट्टी किंवा क्रिकेट सट्टेबाजी सुरू होऊ शकत नाही. तसेच गांजाविक्री, अंमल पदार्थ विक्री किंवा जुगार अड्डा सुरू करायचा असल्यास स्थानिक पोलिस स्टेशनपेक्षा गुन्हे शाखेच्या पथकाची परवानगी मिळविण्यासाठी जुगारअड्डे संचालक धडपड करीत असतात अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police personnel outnumber squads