यवतमाळ : पत्नीच्या आत्महत्येनंतर पोलिस पतीने केले विष प्राशन

दिनकर गुल्हाने
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

घरगुती वादातून येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पुसद (जि. यवतमाळ) : घरगुती वादातून येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज शुक्रवारी (ता. 27) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

दरम्यान, अत्यवस्थ असलेले पोलिस शंकर राठोड यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले व त्यानंतर नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. वर्षा शंकर राठोड (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

शंकर राठोड हे पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या शासकीय वाहनावर चालक आहेत. शंकर राठोड हे पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिस वसाहतीत राहतात. आज सकाळी त्यांचे पत्नीसोबत घरगुती वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शंकर राठोड घराबाहेर पडून पोलिस ठाण्यात आले.

दरम्यान, काही वेळानंतर ते घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने पंख्याला लटकवून घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे भावनावेग अनावर होऊन दुचाकीवरून ते थेट कीटकनाशकाच्या दुकानात गेले व 100 मिली एवढे विषारी औषध प्राशन करून पुतण्याला फोन केला. उलट्या सुरू झाल्याने शंकर राठोडची तब्येत बिघडली. पुतण्या प्रेम राठोडने लगेच त्याला पुसद येथीलच लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळला व त्यानंतर नागपूर येथे रवाना करण्यात आले. पुसद शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमेश आत्राम याबाबतची पुढील चौकशी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police poisoned by after wife's suicide in yavatmaal district