अबब! पोलिसांच्या धडक कारवाईत सापडला पाच लाखांचा मुद्देमाल

liquer.
liquer.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील गर्कापेठा येथील दारूविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी शेख व त्यांच्या पथकाने विशेष अभियान राबवत तब्बल ४ लाख ९१ हजारांचा ७५ ड्रम मोहसडवा व इतर साहित्य नष्ट केले.


गर्कापेठा येथील गाव संघटनेच्या पुढाकारातून दीड वर्षापासून गावात दारूविक्री बंद आहे. मात्र, काही मुजोर लोकांनी गूळ आणि मोहफूल आणून सडवा टाकला होता. गावातील विविध ठिकाणी ५० ड्रम सडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ चमूला मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांना कळविण्यात आले.

स्वामी यांनी गर्कापेठा येथे अभियान राबविण्याचे निर्देश बामणी पोलिसांना दिले. प्रभारी पोलिस अधिकारी शेख व त्यांचे पथक गर्कापेठा येथे रवाना झाले. गावातील १३ ते १४ विविध ठिकाणांची पाहणी केली. दरम्यान गावातील मेडी दुर्गम, सुनीता महेश दुर्गम, तिरुपती कुमरी, गौरया जाळी, शंकर राजम जाळी, समया कोंडागुर्ला, राजन्ना कोंडागुर्ला यांच्या घर परिसरात मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा आढळून आला. त्यामुळे आरोपी फरार झाले. ७३ ड्रम गुळाचा व २ ड्रम मोहसडवा, ५० लिटर दारू, १३ पेट्या गूळ व दारू गाळण्याचे साहित्य, असा एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. बामणी पोलिसांच्या या कृतीमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. गावकऱ्यांनीसुद्धा यावेळी पोलिसांचे आभार मानले. यावेळी मुक्तिपथ चमूचे सदस्य उपस्थित होते.

सावलखेडा येथे शिबिर
कुरखेडा तालुक्‍यातील सावलखेडा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला एकूण १० व्यसनी रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्‌भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन दारू सोडण्यास इच्छुक रुग्णांनी शिबिराला भेट दिली. शिबिरात दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com