नंदनवन पोलिस ठाण्यावरच पोलिसांचा छापा!

नंदनवन पोलिस ठाण्यावरच पोलिसांचा छापा!

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून कपाटात ठेवलेले एमडी ड्रग्स पोलिस उपायुक्‍त आणि सहायक आयुक्‍तांनी जप्त केले. तसेच पाच पोलिसांना निलंबित केल्याने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. येथून 34 ग्रॅम ड्रग्स आणि 2 लाख 45 हजार रुपये जप्त करण्यात आले. 
नंदनवन पोलिसांनी ड्रग्स तस्करांकडून उपरोक्त साहित्य जप्त केले होते. ते ठाण्यातील कपाटात ठेवले होते. आरोपी पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, नायक शिपाई राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगन, रोशन निंबर्ते आणि अभय मारोडे अशी अटकेतील पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणाची हवा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना लागू नये म्हणून आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. तरीही ड्रग्स आणि वसुलीचे पैसे पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने पोलिस ठाण्यातील एका खोलीत ठेवल्याची माहिती पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे पोलिस उपायुक्‍त एस. निर्मलादेवी आणि सहायक पोलिस आयुक्‍त रघुनाथ धापावकर यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. डीसीपी आणि एसीपी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी नंदनवन पोलिस ठाण्यातील डीबी रूममध्ये छापा घातला. पोलिस अधिकाऱ्यांनी छाप्यातून 34 ग्रॅम एमडी आणि 2 लाख 45 हजार जप्त केले. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पाचही पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. 
असे आहे प्रकरण 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्‍टोबरला दुपारी नंदनवन ठाण्यातील डीबी पथकाचे पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, नायक शिपाई राजेंद्र शिरभाते, दिलीप अवगन, रोशन निबर्ते आणि अभय मारोडे यांनी जमाल शेख व जावेद अली यांच्यासह त्याच्या काही साथीदारांना ड्रग्ससह पकडले होते. मात्र, कारवाईदरम्यान जमाल हा पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. डीबी पथकाने आरोपी पळून गेल्याची माहिती बाहेर येऊ दिली नाही. दरम्यान, ताब्यातील जावेदला हवालदार सचिन एम्प्रेडीवार यांनी अडीच लाखांची मागणी केली. तसेच जप्त केलेली ड्रग्ससुद्धा ठेवून घेणार, अशी बोली केली. जावेदने पैसे आणि ड्रग्स दोन्हीही पोलिसांना देण्याचे कबूल करीत सुटका करून घेतली. 
अतिआत्मविश्‍वास नडला 
ड्रग्स तस्करांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आल्यानंतर पाचही पोलिसांनी पैसे वाटून घेत ड्रग्सची विक्री करण्याचे ठरविले. मात्र, मोठा खरीददार मिळेपर्यंत ड्रग्स सर्वसंमतीने पोलिस ठाण्यातील डीबी रूममधील कपाटात ठेवण्याचे ठरविले. नियोजनानुसार ड्रग्स आणि पैसे कपाटात ठेवले. कुणीतरी या प्रकाराची माहिती पोलिस आयुक्‍तांना दिली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. 
डीबी पथके की वसुली पथके? 
शहरातील अनेक पोलिस ठाण्यांतील डीबी पथके आणि डीसीपींची विशेष पथके ही फक्‍त वसुली करण्यासाठी स्थापन केली जातात. अवैध धंदेवाल्यांकडून "तोडी' करण्याची विशेष जबाबदारी या पथकांवर असते. ही पथके महिन्याकाठी लाखो रुपये कमवितात, अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी अजनीच्या डीबी पथकाचा एक प्रताप समोर आला होता, तर एका झोनच्या पथकानेही रीडरच्या मदतीने गेल्या आठवड्यात "मोठी तोडी' केल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com