नागपूरकरांच्या औदार्यावरच प्रश्‍नचिन्ह? 

नागपूरकरांच्या औदार्यावरच प्रश्‍नचिन्ह? 

नागपूर - समाजरक्षण करण्याचे स्वप्न घेऊन पोलिस दलात भरती होण्यासाठी हजारो तरुण नागपुरात आले. घरादारापासून दूर आलेल्या या तरुणांची आजची स्थिती अक्षरशः निराधार अशी झाली आहे. रात्र फुटपाथवर काढून व सकाळी अल्प नाश्‍ता खाऊन हे तरुण कठोर अशी शारीरिक परीक्षा देत आहेत. पण, त्यांना पिण्याचे पाणी, पोटात घालायला दोन घास किंवा सावलीसाठी निवारा देण्याचेही औदार्य दुर्दैवाने दिसून आले नाही. 

ग्रामीण भागातूनच नव्हे, तर अवतीभवतीच्या जिल्ह्यांतून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गेल्या 23 मार्चपासून 240 शिपाई पदांसाठी भरती होत आहे. 40 हजार उमेदवारांनी या वर्षी अर्ज केले. रखरखत्या उन्हात हे उमेदवार मैदानी परीक्षा देत आहेत. पहाटे 5 वाजताच मैदानावर उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जवळपासच्या गावांवरून आलेले युवक इतक्‍या पहाटे कसेबसे मैदानापर्यंत पोहोचतात. पण, दूरच्या गावांवरून आलेले अनेक तरुण रेल्वेस्थानकासमोर, पोलिस मैदानाजवळ, रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर रात्र काढतात. अनेकांकडे रात्री आणलेली शिदोरी असते, तर कुणाकडे नसल्यामुळे सकाळी टपरीवर जे मिळेल ते पोटात ढकलून मैदानावर लगबगीने पोहोचतात. मैदानी सरावासाठी आवश्‍यक असलेले पुरेसे जेवणही त्यांच्या पोटात नसते. तरीही पोलिस विभागात भरती व्हायचेच, अशी जिद्द बाळगून ते जीव पणाला लावून धावतात. 

मात्र, पोलिसांच्या भल्यासाठी मिरविणाऱ्या तथाकथित संघटनेचा एकही पदाधिकारी तिकडे फिरकताना दिसत नाही. तसेच कार्यकर्त्यांना टी-शर्ट देणाऱ्या आणि दारू पाजणाऱ्या पुढाऱ्यांनाही पाझर फुटत नसल्याचे चित्र आहे. साधे थंड पाणी पाजण्यासाठीचे हातही आक्रसले की काय, असे वाटत आहे. दर महिन्याला धार्मिकस्थळी भंडारा-भोज करणारे किंवा समाजसेवक म्हणून मिरविणारे नेते, संस्था नेमक्‍या या वेळी कुठे गेल्यात, हे समजत नाही. मैदानावर रक्ताचे पाणी करणाऱ्या किती तरुणांचे पोलिस दलात जाण्याचे स्वप्न साकारेल, हे माहीत नाही; पण साधे पाणीही पुरवू न शकणाऱ्या नागपूरकरांचे चांगले चित्र मात्र त्यांच्या मनात निश्‍चितच तयार झालेले नसेल, हे नक्की. 

भाऊ, कुणी लिफ्ट बी देत नाही... 
शुक्रवारी पहाटे पोलिस भरतीसाठी मैदानावर पोहोचण्याची धडपड करीत होतो. सदरमधील एका रस्त्यावरून आठ ते दहा दुचाकीस्वार गेले. त्यांना हात दाखवू-दाखवू थकलो भाऊ, पण कुणीबी लिफ्ट देत नव्हते. एवढ्या पहाटे पळत सुटलो आणि मैदानावर पोहोचलो. 
- संतोष, उमेदवार 

भरतीसाठी येणाऱ्या मुलांची संख्या पाहता आर्थिक दृष्टीने जेवण किंवा पाणी वाटणे शक्‍य नाही. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून मदत करणे शक्‍य नाही. मात्र, येत्या दोन-तीन दिवसांत काही मदत करण्याचा प्रयत्न मी करतो. 
-नीलेश नागोलकर, सामाजिक कायकर्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com