हुशऽऽऽ... आता आम्ही जातो आमुच्या गावा... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 डिसेंबर 2019

दहा दिवसांपासून सुरू असलेले नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. या दहा दिवसांत पोलिसांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता "आम्ही जातो आमुच्या गावा...आमचा रामराम घ्यावा' अशा शब्दात पोलिसदादांनी एकमेकांचा निरोप घेत आपापल्या गावाची वाट धरली आहे. शनिवारी सायंकाळी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांची गळाभेट घेत निरोप घेतला. पोलिस दादांची घराकडे निघण्याची घाई आणि चेहऱ्यांवरील आनंद पाहण्यासारखा होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बंदोबस्त निर्विघ्न ठरला, हे विशेष. 

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडले. गेल्या दहा दिवस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. शनिवारी पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झाला होता. हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे व बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना संपूर्ण सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विशेष व्यवस्था केली होती. 

बाहेरगावावरून नागपुरात बंदोबस्तासाठी आलेले काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळीच आपले घर गाठले; तर काही अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी नागपुरातून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या मनावरील ताण कमी झाला आहे. 

Image may contain: 3 people, people standing, people walking and outdoor
नागपूर ः हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर खरेदीसाठी जाताना पोलिस कर्मचारी. 

पोलिस आयुक्‍तांचे अभिनंदन

 
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून हिवाळी अधिवेशनादरम्यान चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्त उपाध्याय यांचे कडेकोट बंदोबस्ताबाबतही अभिनंदन केले.

Image may contain: 4 people, people standing and outdoor
नागपूर : एकमेकांची गळा भेट घेऊन गावाकडे जाताना पोलिस कर्मचारी.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन शांततेत पार पडावे, यासाठी पोलिस अधिकाऱ्यांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मेहनत घेतली. या बंदोबस्ताचे श्रेय माझ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याच्या मेहनतीला देत असल्याची प्रतिक्रिया डॉ. उपाध्याय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

अधिक माहितीसाठी - बांधवांनो, अगोदर सत्य तर समजून घ्या

संत्रा बर्फी आणि बर्डीची शॉपिंग 

नागपुराची प्रसिद्ध संत्री व संत्राबर्फी खरेदीसाठीही बाहेरगावावरून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केट व विविध हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. अनेका पोलिसांनी मुलांसाठी खेळणे आणि बर्डीत शॉपिंग केली. तसेच नागपुरात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना एकमेकांसोबत सेल्फीचा मोह आवरता आला नाही. नागपुरात आपण भेटलो ही आठवण सदैव स्मरणात राहावी म्हणून पोलिसांनी ही सेल्फी काढली. 

क्लिक करा - शेतकऱ्याची सक्‍सेस स्टोरी, केवळ तीन एकरात साडेचार लाखांचे उत्पन्न!
 

अश्रू आणि गळाभेट 

अनेक महिला पोलिस कर्मचारी प्रशिक्षण घेताना सोबत होते. त्यांची पुन्हा अधिवेशनाच्या बंदोबस्तानिमित्त भेट झाली; तर काहींना नवीन मैत्रिणी, मित्र भेटले. बंदोबस्त संपल्यानंतर शनिवारी सायंकाळी घराकडे निघण्यापूर्वी काही महिला कर्मचारी एकमेकींची गळाभेट घेत होत्या. एकमेकींना "बाय' करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते; तर काहींनी चक्‍क अश्रूला वाट मोकळी करून पुन्हा भेटण्याचे आश्‍वासन घेत निरोप घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police says, We go to our village ...