नेट कॉलिंगमुळे पोलिस त्रस्त

अनिल कांबळे
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

अशी घ्या खबरदारी
मोबाईलवर अनोळखी क्रमांक आल्यास उचलू नका. विशेष क्रमांकाचा मोबाईल नंबर दिसल्यास प्रतिसाद देऊ नका. ई-मेल किंवा मॅसेजवर आलेल्या कंपनींच्या क्रमांकावर फोन लावू नका. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर वारंवार कॉल आल्यास पोलिसांशी संपर्क साधा. १४०० अशा क्रमांकावरून आलेले कॉल टाळा.

नागपूर - सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले असून, इंटरनेट स्वस्त झाल्याने अनेकांचा ऑनलाइन व्यवहार वाढला. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेताहेत. सध्या खात्यातून पैसे उडविण्याचा प्रकार वाढला असून, त्यासाठी नेट कॉलिंगद्वारे फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. नेट कॉलिंगमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

सध्या सायबर गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, देशभरात ‘नेट फिशिंग’चे जाळे विणले जात आहे. यात नेट कॉलिंगने भर टाकली असून, अनोळखी नंबरवर कॉल आल्याने पोलिस विभागही त्रस्त आहे. मोबाईलचा डाटा स्वस्त झाल्याने अनेक जण फोन लावण्यापेक्षा वॉट्‌सॲप कॉलिंग किंवा नेट कॉलिंगला प्राधान्य देतात. या फोन कॉलला पैसे लागत नाही. डाटामुळे फोनवर बोलणे आणि इंटरनेट वापरण्याची सुविधा आहे. अनेक जण पैसे वाचविण्यासाठी नेट कॉलिंग करतात. परंतु, नेट कॉलिंगचा डाटा स्टोअर राहत नाही. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. फसवणुकीसह अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी आरोपी नेट कॉलिंगचा वापर करतात. नेट कॉलिंगने अनेकांना लाखोंचा गंडा घातला जातो. 

विदेशात राहणाऱ्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी अनेक जण नेट कॉलिंगचा पर्याय निवडतात. अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून हा संपर्क साधला जातो. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि काही मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही कॉल करता येते. मात्र, गुन्हेगार नेट कॉलिंगच्या माध्यमातून एखाद्याची वैयक्‍तिक माहिती काढून फसवणूक करताहेत. खंडणी, अपहरण आणि धमकीसाठी नेट कॉलिंगचा वापर होतो. नेट कॉलिंग कोणत्या ठिकाणावरून होत आहे, हे शोधणे अडचणीचे आहे. अनेकदा विदेशातून कॉल येत असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी मोठी अडचण ठरत आहे. 

प्रेमीयुगुलांचा फंडा
मुलगी किंवा मुलगा फोनच्या बिलामध्ये कुणी अनोळख क्रमांक येऊ नये म्हणून नेट कॉलिंगचा वापर करतात. मोबाईलचा सीडीआर काढल्यास नेट कॉलिंगचे क्रमांक दिसत नसल्याने प्रेमीयुगुल नेट कॉलिंगवरून संपर्कात राहतात. नेट कॉलिंगमुळे पालकांच्या हाती मोबाईल लागला तरी प्रेमप्रकरणाची माहिती मिळत नाही.  

अशी घ्या खबरदारी
मोबाईलवर अनोळखी क्रमांक आल्यास उचलू नका. विशेष क्रमांकाचा मोबाईल नंबर दिसल्यास प्रतिसाद देऊ नका. ई-मेल किंवा मॅसेजवर आलेल्या कंपनींच्या क्रमांकावर फोन लावू नका. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर वारंवार कॉल आल्यास पोलिसांशी संपर्क साधा. १४०० अशा क्रमांकावरून आलेले कॉल टाळा.

नेट कॉलिंगमुळे लोकेशन शोधण्यास कठीण जाते. तसेच टॉवर लोकेशन घेण्यासाठी अडचणीचे जाते. त्यामुळे मोबाईलधारकांनी नेट कॉलिंगवरून आलेले कॉल उचलू नये. आर्थिक फसवणूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
-विशाल माने, (सायबर क्राइम, नागपूर)

Web Title: Police troubled due to net calling in nagpur