राजकीय सुंदोपसुंदीत अन्नदात्याची होत असलेली हेटाळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political favoritism farmer facing problem rain damage crops khaiff crop washim

राजकीय सुंदोपसुंदीत अन्नदात्याची होत असलेली हेटाळणी

वाशीम : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून खरिप हंगाम आता पाण्यात डूबला आहे. प्रचंड नुकसान होऊनही शासन स्तरावर सर्वेक्षण किंवा मदत याबाबत कोणतीही घोषणा नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. एका दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने खरिपाची आशा मावळत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. पेरण्या आटोपून चाळीस दिवसाचा कालावधी उलटला तरी पिके अजूनही जमीनीलगतच आहेत. साचलेल्या पाण्याने जिल्ह्यातील पंचविस टक्के जमीनीवरील पिक नष्ट झाले आहे.

उर्वरित पिके पिवळी पडली आहेत या पिकातून उत्पन्नाची अपेक्षाच नसल्याने शेतकरी भांबावून गेला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धिर देण्याऐवजी शासन स्तरावर राजकीय कुरघोड्या सुरू असल्याने अजून सर्वेक्षण वा मदतीबाबत कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. या अस्मानी संकटाने शेतकर्यांची उमेदच पणाला लागली आहे. मात्र शासन दरबारी याची दखलच घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

सोयाबीनसाठी उरले केवळ वीस दिवस

जिल्ह्यातील नव्वद टक्के जमीनीवर खरिपात सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. सोयाबीनची पेरणी होवून चाळीस दिवसाचा कालावधी उलटला आहे. साठ दिवसात सोयाबीन पिकाचा फुले व फळधारणेचा कालावधी आहे. मात्र सततच्या पावसाने सोयाबीन जमीनीलगतच असल्याने फुले व फळधारणा होणार कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतावर जाऊन सर्वेक्षण गरजेचे

अतिवृष्टीचा निकष लावताना प्रशासन पावसाची मिलिमीटर स्वरूपात नोंदी लक्षात घेते. इथे सतत २८ दिवसांपासून रिपरिप सुरू असल्याने हा पाऊस मोजणार कसा व झालेल्या नुकसानीचा हिशेब लावणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कृषी विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने शेतावर जाऊन सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

हेटाळणी संतापजनक

शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पाण्यात गेला असताना शासन स्तरावरून कोणतीच दखल घेतली जात नाही ही बाब अतिशय संतापजनक आहे. जिल्ह्याचा आर्थिक डोलारा शेतीवरच अवलंबून असताना अन्नदात्याची होत असलेली हेटाळणी शेतकऱ्यांसाठी क्लेषदायक ठरत आहे. राजकीय धुळवडीत अन्नदात्याचा शिमगा होत असताना राजकीय व्यवस्था बघ्याची भूमिका वठवत आहे.

- गजानन ठाकरे शेतकरी जांभरूण महाली

Web Title: Political Favoritism Farmer Facing Problem Rain Damage Crops Khaif Crop Washim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..