स्थगित सभेवरून राजकारण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नागपूर -दिवंगत सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकार यांनी दिवंगत सदस्याबाबत संवेदना व्यक्त करण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त करीत सभेसाठी पुढील तारखेची घोषणा न करताच सभा स्थगित करणे योग्य नसल्याचे म्हटले. 

नागपूर -दिवंगत सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकार यांनी दिवंगत सदस्याबाबत संवेदना व्यक्त करण्याची संधी न दिल्याने नाराजी व्यक्त करीत सभेसाठी पुढील तारखेची घोषणा न करताच सभा स्थगित करणे योग्य नसल्याचे म्हटले. 

कॉंग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी श्रद्धांजलीचे कारण पुढे करून महत्त्वाच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. मात्र, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिवंगत सदस्याला श्रद्धांजलीनंतर सभा स्थगित करण्याच्या परंपरेचे पालन केल्याचे सांगितले. महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महाल येथील नगरभवनात आयोजित करण्यात आली होती. नुकतेच निधन झालेले सदस्य नीलेश कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण करून महापौर नंदा जिचकार यांनी सभागृह अनिश्‍चित काळासाठी स्थगित केले. यावर पाण्यासारख्या मुद्यावर सदस्यांना बोलायचे होते. परंतु, सभेसाठी पुढील तारीख घोषित न केल्याने पाण्यामुळे त्रस्त नगरसेवकांनी केव्हा चर्चा करावी? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी उपस्थित केला. नगरसेवक गुडधे पाटील यांनी महापौरांनी उद्या सभागृह बोलविणे आवश्‍यक होते, असे म्हटले. महापौरांनी महत्त्वाच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी गुडधेंचा आरोप खोडून काढला. उद्या नाग नदीसंदर्भात सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली असून, 22 ते 26 एप्रिलदरम्यान महापौर नंदा जिचकार महापौर परिषदेसाठी बाहेरगावी जाणार आहेत. त्यामुळे सभागृह 28 तारखेनंतर घेण्यात येईल, असे जोशी यांनी सांगितले. 

सदस्यांच्या निधनाचा फायदा घेण्याची परंपरा भाजपमध्ये नाही. गुडधे पाटील स्वयंघोषित विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्याशी सभा स्थगितबाबत बोलणे झाले, त्यानंतर निर्णय घेण्यात आला. 
- संदीप जोशी, सत्तापक्ष नेते. 

सभा स्थगितीबाबत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांचा काल फोन आला होता. परंतु, आज सभेत दिवंगत सदस्याबाबत विरोधी पक्षनेता म्हणून संवेदना व्यक्त करण्याची संधी न देताच महापौरांनी सभा स्थगित करणे योग्य नाही. 
- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते. 

दिवंगत सदस्यांच्या श्रद्धांजलीचे कारण पुढे करून सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित ठेवण्यात आली. उद्या सभा घेणे शक्‍य होते. परंतु, चर्चा घ्यायचीच नाही, अशाप्रकारे हुकूमशाही सुरू झाली. 
- प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेवक. 

Web Title: Politics from the adjourned meeting