Vidhan Sabha 2019 अकोल्यात वि. दा. सावरकरांवर राजकारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहील हे सांगता येत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात कलम 370 हा मुद्दा प्रचारात असताना गेले दोन दिवस स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील जाहीर सभेत या मुद्यावर भाष्य केल्यानंतर पुन्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

कॉंग्रेसच्या कार्यकाळात वि. दा. सावरकर यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा सोयीस्करपणे विसर पडून त्यांचा अवमान करण्यात आला. त्यांना भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवण्यात आले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केला होता. त्यापूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यातही सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे वचन देण्यात आले आहे. सावरकरांसोबतच महात्मा जोतिबा फुले यांचा मुद्दाही भाजपने प्रचारात आणल्याचे दिसून येते. अकोल्यातील जाहीर सभेनंतर या मुद्यावर सर्वच राष्ट्रीय वाहिन्यांनी चर्चा घडवून आणली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पंतप्रधानांची री ओढत सावरकरांवर कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. प्रचारात शेतकरी व शेतमालासह विकासाचे अनेक मुद्दे असतानाही भाजपने जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा उचलून धरत प्रचाराचा शेवटच्या टप्प्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे दिसून येते.

कॉंग्रेसकडून टीका
वि. दा. सावरकरांचा कॉंग्रेस कार्यकाळात अवमान झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे. प्रचारात सावरकर यांच्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य करून मतदारांचे विकासाच्या मुद्यावरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रचारातील शेवटचे दोन दिवस सावरकर हेच केंद्रस्थानी राहणार असल्याचे दिसून येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: politics on vinayak damodhar sawarkar