ओढणीने केला घात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

भावनांचा बांध फुटला 
अपघाताची माहिती पूजाच्या कुटुंबाला मिळताचा घरी एकच गलका झाला. अर्धा तास आधीच हसत-खेळत कामावर निघालेल्या पूजाचा अपघात झाल्याचा त्यांचा विश्‍वासच बसत नव्हता. घटनास्थळावर पूजाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या भावनांचा बांध फुटला. अजमेरा टायर्समधील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले होते.

वाडी - चाकात अडकलेली ओढणी सावरताना तोल गेल्याने दुचाकीस्वार युवती  रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. मंगळवारी सकाळी अमरावती मार्गावरील दत्तवाडी मारुतीनगर व आशा हॉस्पिटलच्या दरम्यान ही घटना घडली. मागच्या चाकाखाली आलेल्या पूजाला ट्रकने काही अंतरापर्यंत अक्षरशः फरपटत नेले. 

पूजा ऊर्फ खुशबू ओमप्रकाश तिवारी (वय २८, रा. रघुपतीनगर, म्हाडा कॉलनी) असे मृत युवतीचे नाव आहे. पूजा एमआयडीसी टोल नाक्‍याजवळील अजमेरा टायर्स येथे मागील चार वर्षांपासून काम करीत होती. तिला आईवडील व एक भाऊ आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ती नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर जाण्यास निघाली. वाडी पोलिस ठाणे ओलांडल्यावर आशा हॉस्पिटलजवळ ओढणी घसरून दुचाकीच्या मागे अडकली. ती सावरताना दुचाकीवरील तिचे नियंत्रण सुटले. ती वाहनासह रस्त्यावर कोसळली. याच दरम्यान मागून येणारा भरधाव ट्रक  तिच्या अंगावरून गेला. मागच्या चाकात अडकून ती काही अंतर फरपटत गेली.  

नागरिकांनी आरडा-ओरड केल्यावर काही अंतरावर चालकाने ट्रक थांबविला. नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून ठेवले. माहिती मिळताच वाडी पोलिसाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी ट्रकचालक शिवलाल शिंदे (वय ३२, टाकरखेडा, चिखली) यास ताब्यात घेतले. यानंतर पूजाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिच्याजवळ असलेल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी ओळख पटविली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Web Title: Pooja Tiwari death in accident