शहरात पीओपी मूर्ती प्रवेशावर बंदी लागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नागपूर - शहरातील मातीने मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी शहरात येणाऱ्या पीओपी मूर्तीवर प्रवेशबंदी लावण्यात येईल, असे मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी नमूद केले. नगरसेविका आभा पांडे यांच्या नेतृत्वात पीओपी मूर्तीविरोध कृती समिती तसेच पारंपरिक मातीने मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनी आज आयुक्तांची भेट घेतली. 

गणेशोत्सव येताच शहरात मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती विक्रीसाठी येतात. पीओपी मूर्तीमुळे तलाव प्रदूषित होत असून, महापालिकेला ते स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागते. याशिवाय पीओपी मूर्तीमुळे पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्यांच्या व्यवसायालाही घरघर लागली आहे. या समस्यांबाबत आभा पांडे यांच्या नेतृत्वात पीओपी मूर्ती विरोध कृती समितीचे संयोजक सुरेश पाठक तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त वीरेंद्र सिंग यांना निवेदन दिले.

पीओपी मूर्तीविक्रेते नियमांचे पालन करीत नसून, महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. तलाव स्वच्छ केल्यानंतर त्यातून निघालेल्या पीओपी मूर्ती डम्पिंग यार्डमध्ये फेकल्या जात असल्याने धार्मिक भावनाही दुखावतात, याकडेही शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. शहरातील मूर्तिकारांना न्याय न मिळाल्यास शहर एक संघर्ष समिती स्थापन करून पीओपी मूर्तीला प्रवेश बंदी करण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही यावेळी पांडे यांनी दिला. शिष्टमंडळात मातीच्या मूर्ती तयार करणारे मूर्तिकार चंदन प्रजापती, चंद्रकांत गाते, गजानन बुरबांधे, नितीन माहुलकर, सुरेश गाते, प्रवीण गाते, बबलू  कपाट, मनोज वखाटे, घनश्‍याम वालदे, प्रवीण कपाटे, योगेश वझे, रामेश्‍वर चौधरी, रतन ठाकरे, गुड्डू वझे, अक्षय वालदे आदींचा समावेश होता.

Web Title: POP Murti not entry in city