पोपटराव पवारांनी केले घाटकुळचे मूल्यांकन

File photo
File photo

चंद्रपूर  : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ गावचे राज्यस्तरीय मूल्यांकन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह तज्ज्ञ समितीने गुरुवारी (ता. 29) केले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील एक हजार गावे आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. यात जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामविकासातील अग्रणी हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी संचालक अधीक्षक ज्ञानेश्‍वर बोटे, उपसंचालक प्रफुल्ल तांबे, व्हीएसटीएफचे मिशन सहयोगी प्रफुल्ल रंगारी, ख्याती मेनझेस, अक्षय प्रकाश यांच्या उपस्थितीत गावाची पाहणी करण्यात आली.
समितीने व्हीएसटीएफच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आयएसओ नामांकित शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीची पाहणी केली. आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, बचतगट, लघुउद्योग, बायोगॅस, गावाने गावासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण कामे, नावीन्यपूर्ण उपक्रम, श्रमदान, स्वच्छता, शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय, शासकीय योजनांचा आढावा घेत मूल्यांकन केले. अंगणवाडीसेविका, कृषीसेवक, तलाठी, आरोग्यसेवक यांना गावासाठी केलेल्या विशेष कामांची विचारणा करण्यात आली. गावकऱ्यांना मार्गदर्शनातून विविध प्रश्‍न उपस्थित करून गावातील खरी परिस्थिती जाणून घेण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तहसीलदार बिराजदार, व्हीएसटीएफच्या जिल्हा समन्वयक विद्या पाल, रत्नशेखर गजभिये, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी अतकुलवार, दीप्ती पोहाडे, विस्तार अधिकारी कुर्झेकर, कृषी अधिकारी संदीप पहापळे, बालविकास अधिकारी अमोल मेरगळ, उमेदचे राजेश दुधे, अहिरकर, सरपंच प्रीती मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, प्रज्ञा देठे, सुनीता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, रजनी हासे उपस्थित होते.
गावातील मुकुंदा हासे, स्वप्नील बुटले, राम चौधरी, अमोल झाडे, चांगदेव राळेगावकर, दिलीप कस्तुरे, गुणाकार पाल, जनहित व मराठा युवक मंडळ, बचतगटाच्या महिला तसेच ग्रामपरिवर्तक राहुल पडाल, गौरव केणे, किशोर गोटमारे, रविराज अहिरे, नीलेश खडसे, विशाल कुंभकर्ण प्रेमदया कसदेकर, आकाश वैराळे, विशाल राठोड, सुपडा वानखेडे, सुमीत तिवारी यांनी सहकार्य केले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांच्या पुढाकाराने गावातील प्रत्येक कुटुंबांना लोकराज्य मासिक दरमहा उपलब्ध होणार आहे. घाटकुळ हे जिल्ह्यातील पहिलेच 'लोकराज्य ग्राम' ठरले आहे. गडचांदूर येथील सुकेश ठाकरे या अभियंत्याने ग्रामपंचायतीला संकेतस्थळ व मोबाईल ऍप बनवून दिले. यावेळी पवार यांच्या हस्ते संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.


बैलगाडीत बसवून स्वागत
पारंपरिक पद्धतीने बैलगाडीत बसवून राज्यस्तरीय समितीचे स्वागत करण्यात आले. बैलगाडी चक्क पोपटराव पवारांनी चालविली. गाव हागणदारीमुक्त असेल, तरच गावात येईल, या वक्तव्याने त्यांनी सुरुवात केली. नशाबंदी, हुंडाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, ग्रामसभेतील निर्णयप्रक्रियेत गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गावाचे निर्णय आपणच घ्यावे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांच्या पूर्ण सहकार्यामुळे आदर्श गाव गावकऱ्यांच्या हातात असून, ते घडवण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com