खासदार संजय धोत्रे यांना केंद्रीय कृषीमंत्री पद?

विवेक मेतकर  
गुरुवार, 30 मे 2019

केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे.

अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे.

भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या निधनानंतर वऱ्हाडात भाजपचा चेहरा म्हणून संजय धोत्रे यांच्याकडे जबाबदारी आली होती. आता त्यांना केंद्रात मंत्रीपद चालुन आल्याने फुंडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे.

सतराव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाने तिनशेपेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मोदी यांच्या दिल्लीतील टीममध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे वजन वाढले आहे. राज्यात विक्रमी मताधिक्य घेत धोत्रे सलग चाैथ्यांदा संसदेत पोहोचले आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी सरकारमध्ये धोत्रे यांची वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, त्यांना महाराष्ट्रातील खासदार गटाचे नेतेपद देवून बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षी त्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्षपद व या पदाला कॅबिनेटचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता ते सलग चाैथ्यांना संसदेत पोहोचले आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि महाबीजसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे दिल्ली दरबारात अकोल्याचे वजन वाढले आहे. 

यशस्वी नेतृत्व
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानसभा निवडणूक, त्यांचे परफेक्ट नियोजन विजय प्राप्त करून देणारे ठरले. मागील विधानसभानिवडणुकीत त्यांनी पक्षश्रेष्ठीपुढे केलेल्या उमेदवारांची शिफारस व मतदारसंघात केलेले नियोजन लक्षवेधी ठरले. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसचा सफाया झाला. महापालिका निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले.

विविध शासकीय खात्यांचे सदस्य
धोत्रे यांनी जिल्‍ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रत्येक गावात त्यांनी कार्यकर्ता जोडण्यासाठी काम केले. याच त्यांच्या राजकीय परिपक्व क्षमतेमुळे त्यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली. 2018 मध्ये त्यांना कॅबीनेट'मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तत्पूर्वी ते महाराष्ट्र राज्य रोजगार निवड मंडळाचे सदस्य होते. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण समितीवर असताना त्यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. 2004 पासून ते अकोला येथे रेल्वेच्या अंदाजपत्रक समितीवर कार्यरत आहेत. एमसीएईआरचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे काम अतुलनीय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility to get Agricultural ministry to Sanjay Dhotre