Vidhan Sabha 2019 : काँग्रेसकडून खामगावातुन राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

काँग्रेसकडून खामगावातुन राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. खामगाव मतदार संघातील उमेदवारी बाबत कमालीची उत्सुकता आहे.

खामगाव : काँग्रेसकडून खामगावातुन राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. खामगाव मतदार संघातील उमेदवारी बाबत कमालीची उत्सुकता आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि तेजेंद्रसिंह चौहान, राजकुमारी चौहान यांची नावे चर्चेत आहेत.  

घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर काल काँग्रेस वतीने सायंकाळी राज्‍यातील ५१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलडाणा जिल्‍ह्‍यातील दोनच मतदार संघातील उमेदवारी घोषित करण्यात आले. यामध्ये बुलडाण्याचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ व मेहकरच्‍या राखीव जागेवर अनंत वानखेडे यांच्‍या नावाची घोषणा करण्यात आली असून खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद मतदार संघांची उमेदवार घोषण अद्याप बाकी आहे. परंतु काँग्रेस कमिटीच्‍या वतीने जाहीर करण्यात आलेल्‍या उमेदवार यादीवरुन काँग्रेस यावेळी तरुणांना राजकारणात पुढे करण्याच्‍या पवित्र्यात दिसून येत आहे.  

काँग्रेसच्‍या नव्‍या पवित्र्यानुसार खामगाव मतदार संघात देखील एखाद्या युवा नेत्‍याला संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. मंगळवारी दुसरी यादी जाहीर होणार असून यात नावांमध्ये तेजेंद्रसिंह चौहान यांच्‍या पत्‍नी तथा युवक काँग्रेसच्‍या जिल्‍हा उपाध्यक्षा राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर असल्‍याचे बोलले जात आहे व पक्षाच्‍या वरीष्ठ नेत्‍यांनी त्‍यांना काम सुरु करण्याचे आदेश देखील दिल्‍याची मतदार संघात चर्चा आहे. त्‍यामुळे तीन टर्म आमदार राहिलेले दिलीपकुमार सानंदा यांनी माघार घेतली असल्याचीही माहिती असून त्यांचे नाव तिकिटाच्‍या शर्यतीत मागे पडले असल्‍याचे दिसून येते. तर काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी जाहीर होते? याबाबत उत्‍कंठा मतदार संघातील सर्वच मतदारांना लागुन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility to give candidacy to rajkumari chauhan congress