सातगावचे टपालघर समाजमंदिराच्या आश्रयात 

बुटीबोरी ः समाजमंदिरात सुरू असलेले सातगावचे टपालघर.
बुटीबोरी ः समाजमंदिरात सुरू असलेले सातगावचे टपालघर.

बुटीबोरी (जि.नागपूर) ः आधुनिक काळात इंटरनेट, दूरध्वनी, ई-मेल, फॅक्‍स वगैरे सोयी उपलब्ध आहेत. परंतु, शासकीय कामकाजाकरिता मात्र आवश्‍यक असलेली कागदपत्रे ही टपालानेच नागरिकापर्यंत पोचतात, याचे आश्‍चर्य नव्हे, तर काय? म्हणून आवश्‍यक असलेली ही टपाल संस्कृती सर्वसामान्य जनतेकरिता जपणे सरकारकडून गरजेचे आहे. मात्र, सातगाव येथील पोष्ट ऑफिस हे "पास्ट ऑफिस' झाल्यामुळे नागरिकांची खरी अडचण होत आहे. एका समाजमंदिरात या टपालघराचे कामकाज कसेबसे सुरू आहे. 

सरकारी कागद मिळतात काम झाल्यावर 
वेणा प्रकल्पाकरिता किनाळा, रिधोरा, दुधाळा, मसाळा, कन्हाळगाव, जयपूर, बोरगाव या सात गावांचे पुनर्वसन करण्यात आले. जवळपास 7,500 लोकसंख्येच्या या वस्तीकरिता नागरी सुविधा पुरविणे सरकारचे धोरण असताना काही काळापूर्वी सातगावला वेणानगर म्हणून नाव देण्यात आले. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रानजीक असलेल्या या गावांत दिवसेंदिवस लोकसंख्येत भर पडत गेली. परंतु, नागरी सुविधेकरिता उपलब्ध करून दिलेले येथील टपालघर मात्र आजही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. आचके देत असताना येथील टपालघराने स्थानिक रिधोरामधील समाजमंदिरात आश्रय घेतला. येथे एक अधिकारी आणि दोन पोस्टमन असे नियोजन आहे. कित्येक दिवसांपासून एक पोस्टमनचे रिक्त पद असून काही दिवसांपूर्वी कायमस्वरूपी असलेल्या एक पोस्टमनची प्रकृती खराब असल्यामुळे आवक टपाल नागरिकांपर्यंत पोचण्यास दफ्तरदिरंगाई होते. कधी कधी स्थानिकांचे महत्त्वाचे टपाल परत जात असल्याचीदेखील तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. 

नाममात्र खुर्च्या 
टपाल कार्यालयात एकूण 600 बचत खाते असून, सुकन्या योजनेचे 100, आरडीचे 550 आणि जीवनविम्याचे 40 खातेधारक आहेत. त्यामुळे या टपालघरात रोज लोकांची काही प्रमाणात वर्दळ नक्कीच राहते. आश्‍चर्य म्हणजे येथे ग्राहकांकरिता साधी खुर्चीदेखील नाही. नाममात्र खुर्च्या असल्यातरी त्यादेखील मोडकडीस आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना येथील महिला अधिकाऱ्यांची मोठी पंचाईत होते. ज्या ठिकाणी हे टपाल कार्यालय आहे ते ठिकाण गावाच्या एका टोकाला असून ती इमारत जीर्ण स्वरूपाची आहे. परिसरात स्वच्छतेअभावी येथील महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा होते. तीन वर्षांआधी येथील अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे कार्यालयाच्या जागेकरिता मागणी केली होती. परंतु, त्याकडे कानाडोळा करण्यात आला. 

व्यवहाराचा खोळंबा 
रोजच्या 30 ते 40 टपालांची आवक-जावक असलेल्या या ठिकाणी रिक्त असलेल्या पोस्टमनच्या रिक्‍त जागेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागते. शिवाय एखादेवेळी येथील अधिकारी रजेवर असल्यास हे टपालघर बंद असते. त्यामुळे खातेदारांचा व्यवहाराविषयीचा खोळंबा होतो. संबंधित विभागप्रमुखाने या जागा भरून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने योग्य ठिकाणी हे टपाल कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com