स्मार्ट सिटी'च्या कंट्रोल बॉक्‍सवर पोस्टर, स्टिकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नागपूर ः शहर सौंदर्यीकरणाच्या स्पर्धेत जागतिक स्तरावर ठसा उमटविण्यासाठी राजकीय नेते, प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यातून स्मार्ट ऍण्ड सेफ सिटी प्रकल्प शहरात तयार झाला. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध चौकांत लावलेले सीसीटीव्ही व वायफाय नियंत्रणाच्या ग्रे रंगाच्या बॉक्‍सवर स्टिकर, पोस्टर चिकटवून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. स्टिकर, पोस्टर लावणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक त्यावर असूनही कारवाई होत नसल्याने चौकाचौकांत शहर विद्रुपीकरणाला महापालिकेकडून प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.

शहरातील विविध चौकांतील वाहतूक सिग्नल, झाडे, महावितरणच्या डीपीवर स्टिकर, पोस्टर लावून शहराच्या सौंदर्यीकरणाला हरताळ फासणाऱ्यांना आता शहरात स्मार्ट ऍण्ड सेफ सिटी प्रकल्पाच्या नियंत्रणासाठी लावण्यात येणारे ग्रे रंगाचे बॉक्‍सही खुणावत आहे. जमिनीपासून केवळ पाच फूट वर असलेल्या ग्रे रंगाच्या बॉक्‍सवर सहज स्टिकर, पत्रके चिकटविता येत असल्याने शहर विद्रुप करणाऱ्यांनी त्याकडे मोर्चा वळविल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
नागरिकांना सहज इंटरनेट सेवा देण्यासाठी तसेच सीसीटीव्ही नियंत्रणासाठी शहरातील विविध चौकांत हजारांवर ग्रे बॉक्‍स उभे केले आहे. स्मार्ट शहराच्या या प्रकल्पाला काही व्यावसायिक, ट्यूशन क्‍लासेस संचालकांनीच लक्ष्य केले आहे. शहर विद्रुपीकरणाची कुठलीही संधी ते सोडत नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट ऍण्ड सेफ सिटी शहरासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नागरिकांनी विद्रुपीकरणासाठी निवडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक चौकातील ग्रे रंगाच्या बॉक्‍सवर पोस्टर, स्टिकर, पत्रके चिकटवून शहरातील नागरिकांनी स्वतःची बेजबाबदारीही अधोरेखित केले.

न्यायालयाची अवमानना
शहर विद्रुप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 2014 मध्ये दिले होते. मात्र, केवळ अवैध होर्डिंग्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, महावितरणची डीपी, विद्युत खांब, वृक्षांवर जाहिरात, फलके, पत्रके व पोस्टर चिकटविणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. न्यायालयाच्या आदेशाचीही अवमानना करणाऱ्यांनाच महापालिका पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Posters, stickers on smart city's control box