विदर्भातील पोल्ट्री उद्योगाची आर्थिक कोंडी

राजेश रामपूरकर
मंगळवार, 27 मार्च 2018

विदर्भातील पोल्ट्री उद्योगाचा विस्तार होत असताना अचानकच कोंबड्यांची उत्पादनापेक्षा मागणी कमी झाली आहे. यामुळे विदर्भातील पोल्ट्री उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोंबड्यांचे पालनपोषण केल्यानंतरही वाजवी किंमत मिळत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर - विदर्भातील पोल्ट्री उद्योगाचा विस्तार होत असताना अचानकच कोंबड्यांची उत्पादनापेक्षा मागणी कमी झाली आहे. यामुळे विदर्भातील पोल्ट्री उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोंबड्यांचे पालनपोषण केल्यानंतरही वाजवी किंमत मिळत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्‍चिम विदर्भ व त्यातही अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार अधिक आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमधील शेतकरी पोल्ट्रीकडे वळलेत. विदर्भामध्ये सध्या 50 लाख अंडी देणाऱ्या (लेअर) आणि सुमारे एक कोटी मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांचे संगोपन होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून विदर्भातील कोंबड्यांच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मात्र, त्याला तीन महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. बाजारात कोंबड्यांना हवी तशी किंमत मिळणे अवघड झाले आहे. कोंबड्यांच्या पालनपोषणाचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकरी आणि पोल्ट्री संचालकांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. आता कोंबड्यांच्या उत्पादनापेक्षा मार्केटिंगवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. सध्या कोंबडीचे प्रतिकिलो दर घाऊक बाजारात 70 ते 75 रुपये प्रमाणे विकल्या जात आहे. कोंबडीचे पालनपोषण करणे, निगा राखण्यापेक्षा ही अतिशय अल्प किंमत आहे. यामुळे पोल्ट्री उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. पूर्वी हैदराबाद, पुण्यापेक्षा नागपुरात कोंबड्यांचे दर अधिक होते. तीन महिन्यांपासून हैदराबाद आणि पुण्याप्रमाणेच येथील दर आहेत. उत्पादनापेक्षा मागणी कमी असल्याने पोल्ट्री उद्योगाला आर्थिक फटका बसला आहे. विदर्भात शेतकऱ्यांनी मेहनत करून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय वाढविला. कडक उन्हाळ्यातही कोंबड्यांची चांगली निगा राखली. आता भाव मिळत नसल्याने नवे आव्हान उभे राहिले आहे. - सुधीर दुद्दलवार, पोल्ट्री व्यावसायिक कोट्यवधींची उलाढाल कडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भात अयशस्वी होतो, या समजाला उत्तम नियोजन व व्यवस्थापनातून उत्तर देत शेतकरी पुढे गेलेत. त्यांच्या यशस्वी मार्गक्रमणामुळे अन्य शेतकऱ्यांमध्येही आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्यातून विदर्भात पोल्ट्रीचा विस्तार वाढला. आज सुमारे एक कोटीपेक्षा अधिक ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन विदर्भात होत आहे. या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

Web Title: Poultry business of vidarbha region are in trouble