वीज केंद्र संपाने संकटात ; वेकोलि कामगारांचे कामबंद

File photo
File photo

चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे मागील दोन महिन्यांत कोळशाच्या उत्पादनात लक्षणीय घट आली आहे. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पुरेसा कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. सध्या पुढील दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा वीज केंद्राकडे शिल्लक आहे. त्यातच आजपासून वेकोलिचे कर्मचारी संपावर गेले आहे. याचा फटका वीज केंद्राला बसणार आहे. त्यांच्यापुढे कोळशाचे गंभीर संकट निर्माण होणार आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वीज उत्पादन क्षमता दोन हजार 920 मेगॅवट आहे. सध्या या वीज केंद्रात आठ संच सुरू आहेत. सातव्या क्रमांकाचा संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या वीज केंद्रातून आजच्या घडीला पंधराशे मेग़ावॅट वीजनिर्मिती होत आहे. सध्या कोळसा ओला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी लागतो. दररोज तीस हजार टन कोळशाचा वापर सुरू आहे. एरवी 40 ते 42 हजार टन कोळसा वीज केंद्राला दररोज लागतो. वीज केंद्राला लागणाऱ्या 75 टक्के कोळशाची गरज वेकोलि पूर्ण करते. यावर्षी पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे अनेक भूतल कोळसा खाणीत पाणी गेले. त्यामुळे कोळसा खाणीतून काढता आला नाही. रस्ते खराब झाले. त्यामुळे कोळशाचे उत्पादन आणि वाहतूक प्रभावित झाली. परिणामी वीज केंद्राला पुरेसा कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. सध्या दोन दिवस पुरेल एवढाच 82 हजार टन कोळसा वीज केंद्राकडे शिल्लक आहे. त्यातच वेकोलित थेट परकीय गुंतवणुकीच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात वेकोलिच्या कामगार संघटना संपावर आहे. भारतीय मजदूर संघाने आजपासून पुढील पाच दिवस कामबंद आंदोलन सुरू केले. उद्या मंगळवारला इंटक, आयटक, सीटू आणि हिंदू मजदूर सभेचे कर्मचारी एक दिवसांचा संप करणार आहे. त्यामुळे कोळसा उत्पादन प्रभावित होईल. याचा फटका वीज केंद्राला बसू शकतो, असे वीज केंद्राचे मुख्य अभियंता आर.एस. घुसे यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून उत्पादन कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी पाचव्या क्रमांकाचा संच दुरुस्तीसाठी काढला जाणार आहे. "ऑईल सपोर्ट 'घेऊन शक्‍य तेवढी वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न राहील, असे घुगे म्हणाले. उपरोक्त संघटनांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. कामगारांचे आंदोलन लांबल्यास वीज केंद्राला कोळशाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com