हृदयाला स्पर्श करण्याची ताकद सिनेमामध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जाणिवा समुद्ध करण्याचे काम सिनेमा करीत असतो. व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करण्याची ताकद फक्त सिनेमामध्ये आहे. वास्तवदर्शी सिनेमातूनच प्रेक्षकांना जबाबदारीची जाणीव होते, असे प्रतिपादन फिल्मगुरू समर नखाते यांनी केले.

नागपूर : व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जाणिवा समुद्ध करण्याचे काम सिनेमा करीत असतो. व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करण्याची ताकद फक्त सिनेमामध्ये आहे. वास्तवदर्शी सिनेमातूनच प्रेक्षकांना जबाबदारीची जाणीव होते, असे प्रतिपादन फिल्मगुरू समर नखाते यांनी केले.
ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत शनिवारी नागपूर महापालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने कविकुलगुरू कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम, आय. टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव "बापू का बायोस्कोप'चे उद्‌घाटन झाले. पहिल्या सत्रातील शेजारी चित्रपटानंतर फिल्मगुरू समर नखाते यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. व्ही. शांताराम यांचे सिनेमे सांस्कृतिक प्रवाहाची जाण आहे. काळानुरूप चित्रपटात बदल झाले असून, प्रत्येक चित्रपटात दिग्दर्शकांचे बौद्धिक गुण दिसून येतात. सिनेमा काढणारे जसे कलासंपन्न असावेत तसेच सिनेमा पाहणारे प्रेक्षकही जागरूक आणि संवेदनशील असले तरच त्यांच्या हृदयाला सिनेमा हात घालतो. प्रेक्षकांची जबाबदारी ओळखायला लावणाऱ्या विषयावर व्ही. शांताराम यांनी प्रकाश टाकला आहे. "शेजारी' या चित्रपटात माणूस म्हणून जगताना एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती अधोरेखित केली आहे, असे समर नखाते म्हणाले.
दुसऱ्या सत्रात कुंकू सिनेमा प्रेक्षकांना दाखविण्यात आला. यानंतर समीक्षक अभिजित रणदिवे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. सिनेमा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा असतो. ज्येष्ठ नागरिक सिनेमा पाहताना आपल्या काळाशी संबंध जोडतात तर तरुण आताचा सिनेमा आणि आधीचा सिनेमा अशी तुलना करतात. त्यामुळे हे जुने सिनेमे फेस्टिव्हलमध्ये दाखविताना ते का दाखवावे आणि कुणासाठी दाखवावे याचा विचार केला जातो. कुंकू सिनेमात समाज आणि व्यवस्थेविरोधात बंड करणाऱ्या स्त्रीचा संघर्ष दाखविला आहे. त्या काळातही स्त्रियांच्या जाणिवा किती प्रगल्भ होत्या हे यातून दिसते. काळ बदलला; परंतु प्रत्येकाचे जगण्याचे संघर्ष कायम असल्याचे प्रेक्षकांना जाणवते, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The power to touch the heart in cinema