सार्वत्रिक निवडणूक लढणार - प्रफुल्ल पटेल

Prafull-Patel
Prafull-Patel

नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना सांगितले. 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांचा समजला जातो. मागील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी त्यांना पराभव केला. राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठविले. नाना पटोले भाजपात फारसे रमले नाही. त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पोटनिवडणूक तेच लढतील अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आघाडी केल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. येथून वर्षा पटेल लढतील अशी चर्चा होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी यास नकार दिला. असे असले तरी पुढील सार्वत्रिक निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे. कितीही  घोषणा केल्या व योजना जाहीर केल्या तरी खालपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. सत्तेच्या विरोधाताली रोषाचाही सामान आगामी निवडणुकीत भाजपला करावा लागणार आहे. लालूप्रसाद यादव, छगन भुबजळ यांना तुरुंगात टाकून सुडाचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या विरोधात राजकीयच नव्हे तर ओबीसी समाजाही मोठ्या प्रमाणात गेला.

याचाही फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज पटेल यांनी व्यक्‍त केला. देशाच्या पुढची राजकीय गणिते काय राहील, या प्रश्‍नावर त्यांनी सध्याच पूर्ण चित्र स्पष्ट व्हायचे असल्याने आत्ताच सांगणे योग्य नसल्याचे सांगितले.

भुजबळ होणार पुन्हा सक्रिय 
तब्बल दोन वर्षांनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आजारपणाकडे सरकारने दुर्लक्ष केले. शेवटी  शरद पवार यांना फोन करावा लागला. यानंतर सिटी स्कॅनसाठी तब्बल पंधरा दिवस सरकारने घेतले. वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने ते बचावले. आपण त्यांना भेटून आलो. ते लवकरच बरे होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनादिन आणि हल्लाबोल यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम पुण्यात  १० जूनला आयोजित केला आहे. यात भुजबळ भाषण देतील आणि पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com