आंबेडकर म्हणतात, "कोण आठवले?'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - 'केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोण आठवले? असा प्रतिप्रश्‍न पत्रकारांना विचारला. यावरून रिपब्लिकन पक्षातील नेत्यांमध्ये सख्य किती आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संदर्भात काही प्रश्‍न विचारले, तर ते दखलयोग्य नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाने उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर प्रचार करीत आहेत. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेसशी आघाडी, कर्नाटकमधील राजकीय स्थिती, केंद्र व राज्य सरकारची धोरणे आदींवर मते व्यक्त केली. या वेळी पत्रकारांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना प्रश्‍न विचारला. काही वेळ स्तब्ध राहिल्यानंतर ते म्हणाले, 'कोण आठवले? मी विसरलो,'' असे म्हणत त्यांनी आठवले यांच्या या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना बगल दिली.

रिपब्लिकन नेत्यांच्या एकीबद्दल काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांना प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करावे, असे विधान केले होते. या विधानाच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना हा प्रश्‍न विचारला होता.

"राहुल गांधींनी थेट बोलणी करावी'
कॉंग्रेससोबत आघाडीला त्यांनी नकार दिला. कॉंग्रेस नेतृत्वाला आघाडीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडी करायची असल्यास कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट बोलणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यस्तरीय नेत्यांशी बोलण्यात आपल्याला उत्सुकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: prakash ambedkar ramdas athawale politics