''पीओके' पाकिस्तानला दानात दिले का?'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अक्‍साई चीनच्या क्षेत्रात चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक धरणे बांधली जात आहेत. काही धरणे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर काही दोन-तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

नागपूर : जम्मू-काश्‍मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर विधानसभेच्या (पीओके) जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून "पीओके'चा भारताशी असलेला संबंध तोडला आहे. यामुळे "पीओके'चा संबंध संपला. ज्या जागेसाठी जवान हुतात्मा झाले, ते "पीओके' पाकिस्तानला दानात दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि संघाने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, की "पीओके' आणि जम्मू-काश्‍मीरदरम्यान आता एक नियंत्रण सीमारेषा आहे. सिमला करार आणि त्यापूर्वी झालेल्या करारानुसार ही नियंत्रण रेषा आंतरराष्ट्रीय नियंत्रण सीमारेषा मानण्यात येत नव्हती. कलम 370 रद्द केल्याने नियंत्रण रेषा व जागेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही नियंत्रण सीमारेषा आंतरराष्ट्रीय नियंत्रण सीमारेषा झाली का, याचाही खुलासा सरकारने केला पाहिजे. हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालॅंड, मिझोराम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल, असेही ते म्हणाले. 

अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अक्‍साई चीनच्या क्षेत्रात चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक धरणे बांधली जात आहेत. काही धरणे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, तर काही दोन-तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. ही धरणे तयार झाल्यावर ब्रह्मपुत्रा बारमाही राहणार नसून फक्त पावसाळ्यापूर्ती मर्यादित राहील. यामुळे अनेक राज्ये तुटतील, असा दावा आंबेडकर यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar talked about POK and government