#saturdayMotivation विशेष मुलांच्या सेवेतून ठेवला समाजासमोर आदर्श (व्हिडिओ) 

सुषमा सावरकर 
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

दिव्यांग मुलांच्या तुलनेने मुलींचे प्रश्‍न अधिक गंभीर आहेत. त्यातही प्रौढ वयात आलेल्या मुलींच्या समस्या अधिक गंभीर आहेत. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांचा मान सन्मान कायम राहावा यासाठी प्रणवती विनोद ढोबळे झटत आहेत. 

नागपूर : आजचा जमाना स्वार्थी आहे. कोणालाही दुसऱ्यांसाठी वेळ नाही. सर्वजण आपापल्या जगात वावरत आहेत. भाऊ भावाच्या मदतीला धावून येत नाही. मुलं आई-वडिलांची मदत करीत नाही. वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकून हात झटकतात. इतकच काय तर मुलांनाही दुसऱ्यांच्या भरोशावर किंवा पाळणाघरात सोडले जाते. विभक्‍त कुटुंब पद्धतीवर प्रत्येकाचा भर आहे. नवरा-बायको दोघेही नोकरीवर असल्यामुळे कुटुंबात अशा समस्या उद्‌भवत आहेत. 

समाजात वावरताना आपल्याला अशी अनेक कुटुंबे दिसून येतील. ज्यांना स्वत:च्या कुटुंबाकडे द्यायला वेळ नाही, ते समाजाचा काय विचार करणार? आजच्या स्वार्थी जमान्यात कोणीही दुसऱ्यांचा विचार करीत नाही. मला काम आहे, बाहेर आहे, तुच बघून घे, यायला वेळ लागेल अशी उत्तरं कुणी मदत मागितल्यास दिली जाते. यामुळे मदत मागनाराही निराश होतो. ही झाली सामान्य लोकांची बाब. विशेष मुलांचा विचार करा बरं? त्यांची स्थिती याहीपेक्षा बेकार आहे. कुणीही त्यांची मदत करण्यास तयार नाही. मात्र, गतिमंद मुलांची काळजी घेण्याचे काम प्रणवती ढोबळे कित्येक वर्षांपासून करीत आहेत. 

हेही वाचा - साथ देते मी तुला... व्हीलचेअरवर पूर्ण केले सात फेरे!

एक दोन नव्हे तर तब्बल दहा वर्षांपासून अनेक गतिमंद मुलींना पोटच्या पोराप्रमाणे वागवून त्यांचे सारेकाही प्रेमाने करणाऱ्या प्रणवती ढोबळे समाजासमोर आदर्श आहेत. आज त्यांच्या सोबतीला 16 शिक्षकांचा स्टाफ असला तरी, अनेक वर्षे एकट्याच त्या मुलींची आई, शिक्षिका व केअरटेकर होत्या. आपण या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून स्वतःच्या दोन महिन्याच्या मुलीला पाळण्यात घालून तिथेच त्या गतिमंद मुलींचे संगोपन करायच्या. "माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना व हेच अमुचे ध्येय' असल्याचे त्या सांगतात. या मुलींची सेवा करताना त्या त्यांच्या पाणीपुरी खाण्यापासून तर हॉटेलात जेवण खावू घालण्यापर्यंत सर्वच इच्छा पूर्ण करतात. 

प्रणवती विनोद ढोबळे यांचे शिक्षण बीएससी.बीएड. एमएसडब्ल्यू झालेले आहे. त्यांना दोन मुली असून, पती विनोद विशेष शिक्षक आहेत. 1992 मध्ये विनोद यांच्या आई-वडिलांनी महिलांसाठी विश्‍वंभर शिक्षण संस्था सुरू केली. 2002 मध्ये प्रणवती यांचा विवाह विनोद यांच्याशी झाला. विनोद शाळेत विशेष शिक्षक म्हणून नोकरी करायचे. दिव्यांग मुला-मुलींसाठी आपण काहीतरी करावं, या भावनेने ढोबळे दाम्पत्याने 2006 मध्ये शहरात तीन महिन्यांचे उन्हाळी शिबिर घेतले. शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यावेळी प्रणवती यांच्या लक्षात आले की, दिव्यांग मुलांच्या तुलनेने मुलींचे प्रश्‍न अधिक गंभीर आहेत. त्यातही प्रौढ वयात आलेल्या मुलींच्या समस्या अधिक गंभीर आहेत. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing
गतिमंद मुलींमध्ये रमलेल्या प्रणवती ढोबळे. 

गतिमंद मुलींचे शिक्षण प्रशिक्षण केंद्र

दिव्यांग मुलींसाठी महाराष्ट्रात एकही शाळा नव्हती. प्रणवती यांनी 2006ला झिंगाबाई टाकळी येथे लीलाताई देशमुख गतिमंद मुलींचे शिक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यात सहा ते अठरा वयोगटाच्या दिव्यांग मुली असतात. येथेच त्यांचे संगोपन केले जाते. एवढ्यावर न थांबता त्यांनी 2016 मध्ये जवाहरनगरात इंदूताई ढोबळे गतिमंद मुलींची कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र या दोन शाळांची स्थापना केली. येथे 18 ते 40 वर्षे वयोगटाच्या दिव्यांग मुली असतात. दोन्ही केंद्रावर शहराबाहेरील दिव्यांग मुली निवासी आहेत. ऑटोद्वारे शहरातील मुलींची ने-आण केली जाते. विशेष म्हणजे ई-लर्निंगद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही पहिली संस्था आहे. मिळणारी मदत रोख स्वरूपात न स्वीकारता ती वस्तूंच्या स्वरूपात द्या, असा प्रणवती यांचा आग्रह असतो. 


प्रणवती विनोद ढोबळे

पालकांना विशेष प्रशिक्षणाची आवश्‍यकता 
दिव्यांग मुला-मुलींना ज्याप्रमाणे प्रशिक्षणाची आवश्‍यकता असते त्याप्रमाणे त्यांच्या पालकांना त्यांच्याशी कसे वागावे, त्यांचे संगोपन कसे करावे, यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्‍यकता असते. पालकांमध्ये याबाबत जागरूकता आणणे गरजेचे आहे. सध्या आमच्या कडे सहा ते चाळीस वयोगटाच्या मुली आहेत. यापुढे वयोगट चाळीच्या पुढील अशा दिव्यांग मुलींना की, ज्यांचे संगोपन करणारे कुणीच नाही अशा 50 मुलींना दत्तक घेऊन त्यांना आजीवन सांभाळण्याची जबाबदारी आम्ही उचलणार आहोत. 
- प्रणवती विनोद ढोबळे,
संस्थाचालक, मो. 9175562200


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranavati Dhobale became the mother of special girls