तोगडियांवरील तोडग्यासाठी शहा संघदरबारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज अचानक नागपुरात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. विशेष म्हणजे विश्‍व हिंदू परिषदेचे नवे अध्यक्ष आणि पदाधिकारीसुद्धा आज नागपुरात होते. सरन्यायधीशांच्या विरोधातील मोहिमेमुळे रामजन्मभूमी प्रकरणात आलेला अडथळा, तसेच पंतप्रधानांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन भाजपला अडचणीत आणणारे प्रवीण तोगडिया यांना शांत करणे, या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शहा यांनी तडकाफडकी नागपूर गाठल्याचे कळते.

अमित शहा दुपारी बारा वाजता विशेष विमानाने नागपुरात आले. विमानतळावरून ते थेट संघ मुख्यालयात गेले. सुमारे चार वाजताच्या सुमारास ते दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे सरसंघचालकांसोबतच सरकार्यवाह भय्याजी जोशी हेही आज शहरात होते. विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार्यवाह यांच्याशी चर्चा केली. याअगोदर उमा भारतीही सरसंघचालकांना भेटून गेल्या. विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विष्णू कोगजे यांनीही संघ पदाधिकाऱ्याच्या भेटी घेतल्या.

रामजन्मभूमी प्रकरणाचे न्यायालयातील कामकाज महत्त्वाच्या टप्प्यावर आले असताना सरन्यायधीशांच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेने त्यात अडथळा आला आहे. त्यामुळे या संदर्भात पुढचे धोरण ठरविण्याबाबत या भेटीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे कळते. विहिंपच्या अध्यक्षपदी न्या. विष्णू कोगजे यांची निवड झाली. त्यामुळे नाराज झालेल्या तोगडिया यांनी राजीनामा देऊन त्याचा सर्व रोष पंतप्रधान आणि अमित शहा यांच्यावर काढला. तेही वारंवार राममंदिराचा मुद्दा उपस्थित करून पक्षाला व सरकारला अडचणीत टाकत आहेत. बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेतील त्यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. एवढ्यावरच तोगडिया शांत बसले नाहीत. त्यांनी देशव्यापी संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यास युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा खटाटोप भाजपला अडचणीचा वाटत आहे. त्यामुळे त्यांना शांत बसविण्यासाठीच शहा यांनी नागपूरला येऊन सरसंघचालकांशी चर्चा केल्याचे समजते.

लिंगायत समाजाच्या मागण्यांवर चर्चा
कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. कॉंग्रेसने लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी काय करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. लिंगायतांना वेगळ्या धर्माला संघ फारसा अनुकूल नाही. त्यामुळे पुढे काय करायचे यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: pravin togdia amit shaha mohan bhagwat